संजयनगर : सांगली जिल्ह्यात अखेर गुईलिन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या रोगाने शिरकाव केला आहे. सध्या सहा संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. त्यापैकी दोनजण जीबीएससदृश आहेत. खासगी रुग्णालयात सहा रुग्ण दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.जिल्ह्यातील सहा संशयित रुग्णांपैकी ग्रामीण भागातून दोन, शहरातून दोन व महापालिका हद्दीत एक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकजण आहे. या संशयित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सांगली जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा उपचारासाठी तत्पर आहे. दूषित पाणी व शिळे अन्नपदार्थ याच्या सेवनामधून या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. रोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे.
सांगलीत जीबीएस सिंड्रोमचा शिरकाव, सहा संशयित रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:33 IST