दोन मोटारींच्या अपघातात औरंगाबादचे सहाजण जखमी; दोन बालकांचा समावेश
By अविनाश कोळी | Updated: October 9, 2022 19:26 IST2022-10-09T19:25:18+5:302022-10-09T19:26:04+5:30
विटा शहराजवळ घटना : दोन मोटारींची समोरासमोर धडक

दोन मोटारींच्या अपघातात औरंगाबादचे सहाजण जखमी; दोन बालकांचा समावेश
विटा:सांगलीहून विटामार्गे औरंगाबादकडे निघालेल्या मोटारीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सहाजण जखमी झाले. यात दोन बालकांचा समावेश आहे. हा अपघात रविवार, दि. ९ ऑक्टाेबर राेजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विटा शहराजवळ तासगाव रस्त्यावरील स्वागत कमानीजवळ झाला.
भरत माधवराव काकडे (वय ५८), त्यांच्या पत्नी निर्मला (५२), मुलगी शारदा आप्पासाहेब कोल्हे (३२), जावई आप्पासाहेब कडुबा कोल्हे (४०), त्यांची मुले सूर्या (१०) व देव (५, सर्व रा. कांचवाडी, औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत. औरंगाबाद येथील भरत काकडे व कुटुंबीय दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोटारीने (एमएच १६ एजे १९१२) आले होते. देवदर्शन झाल्यानंतर त्यांनी शनिवारी सांगली येथे नातेवाइकांकडे मुक्काम केला. रविवारी सकाळी ११ वाजता ते विटा, फलटण मार्गे औरंगाबादला निघाले होते.
त्यांची मोटार विटा शहरापासून तीन किलाेमीटरवर असलेल्या स्वागत कमानीजवळ आली असता चुकीच्या बाजूने आलेल्या दुसऱ्या मोटारीने (एमएच ०१ बीबी ९५९७) काकडे यांच्या मोटारीला समोरून जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, औरंगाबादकडे निघालेल्या मोटारीतील भरत काकडे, निर्मला काकडे, शारदा कोल्हे, आप्पासाहेब कोल्हे यांच्यासह दोन लहान मुले सूर्या व देव कोल्हे असे सहाजण जखमी झाले.
या अपघातातील जखमींना तातडीने प्रथम विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दुसऱ्या मोटारीचा चालक चंद्रकांत भाऊसाहेब देवकते (४५, रा. डोर्लेचाळ, गुंडादाजी चौक, पंचशीलनगर, सांगली) यांच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक विक्रम गायकवाड पुढील तपास करीत आहेत.