आगळगाव येथील शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:02 IST2017-10-18T16:55:21+5:302017-10-18T17:02:03+5:30
आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चिमुरड्या बहीण-भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनुष्का सुनील बाबर (वय साडेतीन वर्षे), समर्थ सुनील बाबर (वय २) अशी बालकांची नावे आहेत.

आगळगाव येथील शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू
ढालगाव , दि. १८ : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चिमुरड्या बहीण-भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनुष्का सुनील बाबर (वय साडेतीन वर्षे), समर्थ सुनील बाबर (वय २) अशी बालकांची नावे आहेत.
यामुळे बाबर कुटुंब ऐन दिवाळीत शोकसागरात बुडाले आहे. आगळगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या बाबर वस्तीवर ही घटना घडली. अनुष्का व समर्थ हे घराशेजारीच शेततळ्याजवळ खेळत होते. घरातील दिवाळीच्या धामधुमीत व्यस्त होते. बऱ्याच वेळानंतर मुले न आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घरातल्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांना मुले कुठेही दिसली नाहीत. त्यांनी मुलांचा शेजारी तसेच जवळपास शोध घेतला असता ती आढळून आली नाहीत. शेततळ्याकडे त्यांनी धाव घेतली असता, त्यांना पाण्यात दोन्ही मुलांंचे मृतदेह आढळून आले.
ते पाहून आई-वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून, उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.