धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 22:29 IST2025-04-30T22:28:09+5:302025-04-30T22:29:26+5:30
एकाचे वय २७ तर दुसऱ्याचे १९ वर्षे

धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
सुरेंद्र शिराळकर, आष्टा: आष्टा बागणी मार्गावर विहिरीत पोहण्यास गेलेल्या चुलत्या पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला केराप्पा धोंडीराम बागडी (वय २७) व अजय पप्पन बागडी (वय १९) दोघे राहणार नागाव रोड, झोपडपट्टी आष्टा अशी चुलत चुलत्या पुतण्याची नावे आहेत. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.
घटनास्थळ व आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आष्टा बागणी रस्त्यावरील मस्के मळ्यातील विहिरीमध्ये परिसरातील युवक पोहण्यास येतात. बुधवारी या विहिरीवर गर्दी होती. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान केराप्पा धोंडीराम बागडी व अजय पप्पन बागडी हे दोघेही पोहण्यासाठी या विहिरीवर आले. दोघांनीही विहिरीत उड्या मारल्या, मात्र पोहताना दम लागल्याने केराप्पा बागडीने अजय बागडी याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. विहिरीमध्ये सुमारे ४० ते ५० फूट पाणी असल्याने परिसरातील युवकांच्या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर त्यांनी आष्टा पोलिसांना माहिती दिली.
आष्टा पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर, सागर जाधव, आसिफ मकानदार, सदाशिव बेडेकर, अनिल बसरकट्टी, महेश गव्हाणे, आमिर नदाफ ,महादेव वनखंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन खोल विहिरीतून दोघांनाही काढण्यासाठी विहिरीत उडी मारली. मिठी मारलेल्या अवस्थेत दोघेही असल्याने मिठी सोडवून दोघांनाही विहिरीतून वर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अजय बागडी याच्या पश्चात आई, तर केराप्पा बागडी याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे, आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे अधिक तपास करीत आहेत.