सांगली : माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख या चारही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश येत्या २२ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत. राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला. चारही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.येत्या २२ एप्रिल रोजी मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. चारही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली. आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत फटकाविधानसभा निवडणुकीत या चारही माजी आमदारांच्या वाट्याला निराशा आली. जगताप व देशमुख यांनी पक्षाविरुद्ध बंड केले. अजितराव घोरपडे यांनी त्यांची ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकली होती. मात्र, विजयापर्यंत त्यांना नेता आले नाही. शिराळ्याचे शिवाजीराव नाईक व आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात रमले नाहीत. त्यांनाही विधानसभा निवडणुकीत ताकद दाखविता आली नाही.
शहरी तसेच ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढत आहे. चार माजी आमदारांच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत होईल. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश लवकरच होईल. प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित नाही. - पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)