कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:00 IST2025-03-20T13:00:06+5:302025-03-20T13:00:36+5:30

विटा/खानापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार ...

Shivaji University sub centre to be set up in Khanapur, announced by Minister Chandrakant Patil | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

विटा/खानापूर : कोल्हापूरच्याशिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. तत्पूर्वी आमदार सुहास बाबर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून उपकेंद्राची घोषणा आजच करावी, अशी मागणी सभागृहात केली होती. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी २०१३ पासून सर्वस्तरांतून पाठपुरावा सुरू होता. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने समिती स्थापन केली होती. या समितीने हे उपकेंद्र खानापूर येथे करावे, अशी शिफारस करणारा अहवाल विद्यापीठाला सादर केला होता. दिवंगत नेते अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, ‘सिनेट’चे सदस्य ॲड. वैभव पाटील यांनीही या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला होता.

आमदार बाबर यांनी बुधवारी विधानसभेत म्हणाले, विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्राची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत आता लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राचा निर्णय आजच जाहीर करावा. हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला.

गायरान जमीन देण्याची तयारी

चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२४ला शासनाला मिळाला असून, या प्रस्तावानुसार खानापूर येथे उपकेंद्र करण्याचा निर्णय जाहीर करीत आहे. या उपकेंद्राला खानापूर येथील गट नं. ५७२/१ मधील ४२ हेक्टर ५६ आर गायरान जमीन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली.

घोषणेनंतर फटाक्यांची आतषबाजी

निर्णय जाहीर झाल्याचे समजताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोष साजरा केला. आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

“दिवंगत नेते अनिल बाबर यांनी खानापूरला उपकेंद्र करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर उपकेंद्र मंजुरीसाठी यश आले. खानापूरच्या उपकेंद्रामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळाला आहे. मतदारांना दिलेला शब्द पाळू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो.” - सुहास बाबर, आमदार, खानापूर

Web Title: Shivaji University sub centre to be set up in Khanapur, announced by Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.