आष्ट्यातील शिवरायांचा पुतळा सांगलीत रोखला, बायपास रस्त्यावर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:23 IST2025-11-05T18:23:00+5:302025-11-05T18:23:26+5:30
पुतळा पुन्हा मूर्तिकाराकडे रवाना

आष्ट्यातील शिवरायांचा पुतळा सांगलीत रोखला, बायपास रस्त्यावर तणाव
सांगली : आष्टा येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. हा पुतळा आष्ट्याकडे नेताना सांगलीतील बायपास रस्त्यावर जिल्हा प्रशासन व पोलिसांनी रोखला. त्यामुळे बायपास रस्त्यावर दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांनी सदरचा आष्ट्यातील पुतळा समितीशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुतळा पुन्हा मूर्तिकाराकडे सुरक्षित नेण्यात आला.
आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समितीने लोकवर्गणीतून पुतळा तयार करण्यास सुरुवात केली. पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्यासाठी तब्बल ३२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. हा पुतळ्याचा चबुतरा अद्याप झालेला नाही. तथापि, हा पुतळा एका संस्थेच्या नियंत्रणाखाली सुरक्षित ठेवण्यात येणार होता. त्यासाठी आष्ट्यातील नागरिकांनी आज तो पुतळा नेण्यासाठी मिरजेत आले होते. याबाबतचे पत्रही प्रशासनास दिल्याचे सांगण्यात आले. दुपारी एकनंतर हा पुतळा एका टेम्पोतून सांगलीतून आष्ट्याला नेण्यात येत होता.
याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांसह आष्टा पोलिसांनी बायपास रस्त्यावर तो टेम्पो रोखला. त्यानंतर आक्रमक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आष्टा शहर पुतळा समिती व आष्टा शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. पुतळा नेल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी संग्राम फडतरे, संग्राम घोडके, शिवाजी आतुगडे, किरण काळोखे, गुंडा मस्के, वरदराज शिंदे यांच्यासह पुतळा समितीचे कार्यकर्ते व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हा तणाव होता. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, दंगल नियंत्रण पथकाची तुकडी दाखल झाली. आचारसंहिता लागू झाल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आंदोलकांना विनंती केली. त्यानंतर शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सदरचा पुतळा हा पुन्हा कारागिराकडे पोलिस बंदोबस्तात सुरक्षित नेण्यात आला. परवानगीनंतरच हा पुतळा देण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.