सांगली महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे, भाजपअंतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:37 IST2025-11-06T18:37:17+5:302025-11-06T18:37:45+5:30
शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती : प्रदेशाध्यक्षाकडून घोषणा

सांगली महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे, भाजपअंतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपअंतर्गत शह-काटशहचे राजकारण चांगलेच रंगले आहे. संभाव्य उमेदवारांवरून सांगली-मिरजेच्या आमदारांनी पालकमंत्र्यांसह प्रदेश उपाध्यक्षांनाही टार्गेट केले होते. या वादावर पडदा टाकला असता तरी आता शहर निवडणूक प्रमुखपदी शेखर इनामदार यांची निवड झाल्याने पक्षांतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारींची घोषणा केली. यात शहर निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार, ग्रामीण प्रमुखपदी आमदार सत्यजित देशमुख, तर निवडणूक प्रभारीपदी माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इनामदार यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे नेते दिलीप सूर्यवंशी, स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी, संजय कुलकर्णी यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी निवडून आलेल्या सर्वांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. यावरून आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याला आमदार सुरेश खाडे यांचेही समर्थन मिळाले. दोन्ही आमदारांच्या रडारवर शेखर इनामदार होते. अखेर पालकमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा करून सारवासारव करीत वादावर पडदा टाकला. आता इनामदार यांची निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्या विरोधकांना झटका बसला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपअंतर्गत राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.