Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:59 IST2025-07-09T18:58:13+5:302025-07-09T18:59:00+5:30
काळजाच्या तुकड्याची ताटातूट अन् आनंदाश्रूत झाली पुन्हा भेट

Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला
दत्ता पाटील
तासगाव : अवघ्या अडीच वर्षांचा शंभू. तासगाव तालुक्यातील पाडळी गावच्या शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचा मुलगा. वडिलांसोबत शेतात गेला. वडील कामात असतानाच नकळत दिसेनासा झाला. शोध घेण्यासाठी बघता बघता गावच्या पोलिस पाटलांपासून ते जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांपर्यंत मोठी यंत्रणा कार्यरत झाली. पंचक्रोशी धावून आली. मात्र तब्बल दोन दिवस, तीन रात्री शोध घेऊनही शंभूचा सुगावा लागला नाही.
मात्र, अनपेक्षितपणे तब्बल ६३ तासांनंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता शंभू छोट्याशा म्हसोबा मंदिरात सापडला. पोटच्या काळजाच्या तुकड्याची ताटातूट झालेल्या आई-वडिलांना शंभू मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
तासगाव तालुक्याच्या दक्षिण टोकाला डोंगराच्या पायथ्याशी सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव असणाऱ्या पाडळीत शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबात शशिकांत पाटील आणि त्यांच्या भावांची मिळून पाच लहान मोठी मुले आहेत. गावालगत असणाऱ्या शेतात हे कुटुंब राहण्यास आहे. शेताजवळूनच ओढा गेला आहे. हा ओढा सध्या भरून वाहत आहे. नकळतपणे मुले ओढ्याकडे जाऊ नयेत, म्हणून अडीच वर्षांच्या चिमुकल्या शंभूला सोबत घेऊन शनिवारी शशिकांत पाटील काही अंतरावरील दुसऱ्या शेतात जनावरे घेऊन गेले होते.
मात्र, सायंकाळी शेतात खेळणारा शंभू अचानक गायब झाला. नातेवाइकांनी शोध घेतला. शंभू सापडत नसल्याची बातमी गावात गेली. नातेवाइकांसह सुमारे शंभरहून अधिक गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली. अखेर रात्री पोलिसांना ही बातमी कळविण्यात आली. पोलिसांची पथक ही घटनास्थळी आले. आणखी शोधमोहीम राबवली; पण शंभूचा शोध लागला नाही.
आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रूधारा थांबेनात. शंभूच्या शोधात रात्र जागून काढली. सकाळी पुन्हा गावकरी शोधमोहिमेत सहभागी झाले. पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी तळ ठोकला. श्वान पथक मागवण्यात आले. दिवसभर पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. तरीही शंभूचा शोध लागला नाही.
सोमवारी पुन्हा शोध सुरू झाला. सांगलीतून जिल्हा पोलिस प्रमुख आले. रेस्क्यू पथक बोलवण्यात आले. ओढ्यासह आजूबाजूतील आठ ते दहा विहिरींचा तळ गाठून शंभूचा शोध घेतला. मनात चुकणाऱ्या शंकेची पाल प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती. सोमवारची रात्रही तशीच तळमळत गेली.
आई,-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू
मंगळवारची सकाळ मात्र शंभूच्या कुटुंबीयांना दिलासा देणारी ठरली. शंभू हरवलेल्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचे लिपिक नेताजी पाटील यांच्या शेतालगत छोट्याशा म्हसोबा मंदिरातच शंभू बसल्याचे नेताजी यांना दिसले. त्यांनी प्रशासनासह कुटुंबीयांनाही माहिती दिली. शंभूच्या वडिलांसह नातेवाईक घटनास्थळी आले. वडिलांनी त्याला पटकन कडेवर घेतले. आई,-वडिलांच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू पाहून गावकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.