बोगस खते, बियाणे पुरवठादारांना बेड्या ठोका - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:14 IST2025-05-09T19:13:36+5:302025-05-09T19:14:14+5:30

खरीप हंगामाची आढावा बैठक

Shackle the suppliers of bogus fertilizers and seeds says Guardian Minister Chandrakant Patil | बोगस खते, बियाणे पुरवठादारांना बेड्या ठोका - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

बोगस खते, बियाणे पुरवठादारांना बेड्या ठोका - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

सांगली : खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांमध्ये भेसळ होणार नाही, याची कृषी विभागाने काळजी घेतली पाहिजे. भरारी पथकाने कार्यालयातून बाहेर पडून निकृष्ट बियाणे, खते बोगस देणाऱ्या पुरवठादारांना बेड्या ठोका, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कीटकनाशक, खते, बियाण्यांची कृषी विभागाने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करण्याची गरज आहे. विविध योजनांच्या लाभासासाठी शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व खूप आहे, ते शेतकऱ्यांना पटवून सांगावे व त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी कार्यवाही प्रयत्न करावेत.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खरीप हंगामासाठी चांगली बियाणे, खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. बोगस बियाणे, खते विकली जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे.

बियाणे, खताचा साठा तयार : विवेक कुंभार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, खरीप हंगामाकरिता एकूण २८ हजार ५०१ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून ते १५ मेनंतर उपलब्ध होईल. एक लाख ९४ हजार २९३ टन खताची मागणी केली आहे. मार्च अखरे जिल्ह्यात ६६ हजार ७०८ टन रासायनिक खताचा साठा शिल्लक असून आजअखेर १४ हजार २१७ टन खताचा पुरवठा झाला आहे.

नैसर्गिक शेतीसाठी एक गाव निवडा

चंद्रकांत पाटील म्हणाले, कृषी विभागाने नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची ओढ व्हावी यासाठी एक गाव पूर्णपणे नैसर्गिक शेतीसाठी निवडावे. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ व उत्पादनात झालेल्या तुटीसाठी त्यांना अर्थसाहाय्य देऊ, असे ते म्हणाले.

Web Title: Shackle the suppliers of bogus fertilizers and seeds says Guardian Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.