सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:16 IST2025-11-17T16:12:48+5:302025-11-17T16:16:50+5:30
वाकुर्डे बुद्रुकच्या शेतात वावर : वनविभाग, ग्रामस्थांनी सोडले नैसर्गिक अधिवासात

सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले
शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील झोळेवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तब्बल सात फूट लांबीचा भलामोठा अजगर आढळून आला. अचानक समोर आलेल्या या अजगरामुळे गावात एकच खळबळ उडाली. अंधारामुळे सुरुवातीला हा साप घोणस असल्याचा समज झाल्याने नागरिकांची भीती अधिकच वाढली होती.
घटनास्थळी तातडीने प्राणिमित्र भीमराव पाटील यांची मदत मागविण्यात आली. त्यांनी पाहणी करून हा साप घोणस नसून अजगर असल्याचे निश्चित केले आणि तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक स्वाती कोकरे, प्राणिमित्र भीमराव पाटील, सरपंच आनंदा कुंभार, संजय झोळे, आनंदा जाधव, सूरज टाळगावकर, पोलिस पाटील बाबूराव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब केसरे, अविनाश पाटील, दादा शेटके, अशोक पाटील आणि विजय झोळे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा अजगर अत्यंत कौशल्याने पकडण्यात आला.
स्थानिक नागरिकांना धास्ती बसू नये म्हणून पथकाने खबरदारीपूर्वक काम करत रात्री उशिरा हा सात फुटी अजगर परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिला. वनविभाग व स्थानिकांच्या तत्परतेमुळे एक संभाव्य धोका टळला असून, पर्यावरण संरक्षणासाठी अशा प्रकारची जाणीवपूर्वक आणि समन्वयातून झालेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.