कॉपी, पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करणार, राजेश क्षीरसागर यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:21 IST2024-12-13T12:20:47+5:302024-12-13T12:21:26+5:30
परीक्षेचे काम टाळल्यास कारवाई, थकबाकीसाठी प्रवेशपत्रे रोखणार

कॉपी, पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करणार, राजेश क्षीरसागर यांनी दिला इशारा
सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी किंवा पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करण्याचा इशारा परीक्षा बोर्डाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. परीक्षेचे काम टाळल्यास शिक्षकांवर कारवाई केली जाईल, तसेच शाळेकडे बोर्डाची थकबाकी असल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे रोखण्याचा इशाराही दिला.
येथील विलिंग्डन महाविद्यालयात जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. बैठकीला विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, विभागीय सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, बोर्डाचे अधीक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दुधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगली तयारी करून घ्यावी. शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावरील गैरप्रकार बंद केले नाहीत, तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग घेऊन कॉपीमुक्तीची शपथ द्या. राज्य परीक्षा मंडळाने बोर्डाचे नवे ॲप विकसित केले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा. यावेळी सुभाष चौगुले, चोथे, लोंढे यांनीही मार्गदर्शन केले.
सात वर्षांनी बैठक
तब्बल सात वर्षांनंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर बैठक झाली. मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या मदतीने कडक नियंत्रणात परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. या महिन्यात शाळा स्तरावर आणि परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रावर कॉपीमुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे.
..तर शाळांवर होणार कडक कारवाया
क्षीरसागर म्हणाले, सामूहिक कॉपी व पेपरफुटीच्या घटना गांभीर्याने घेतल्या जातील. केंद्रशाळेचे अनुदान बंद करणे, शाळा स्वयम् अर्थसहायित करण्यासाठी शिफारस करणे, शाळेचे सांकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई केली जाईल. बैठकीला गैरहजर असलेल्या शाळा प्रमुखांना नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.