Sangli-Local Body Election: आटपाडीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक उमेदवार कोट्यधीश, बाकी लक्षाधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:23 IST2025-12-05T17:22:46+5:302025-12-05T17:23:42+5:30
उमेदवारांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता

Sangli-Local Body Election: आटपाडीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक उमेदवार कोट्यधीश, बाकी लक्षाधीश
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. थेट लढतीत चार उमेदवार मैदानात होते आणि निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रांमधील स्थावर व जंगम मालमत्तेच्या तपशीलातून उमेदवारांची आर्थिक स्थिती स्पष्ट झाली.
सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पोपट पाटील यांनी, कारण ते या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून समोर आले. त्यांच्या नावावर तब्बल एक कोटी ८० लाख ४२ हजार रुपयांच्या मालमत्तेची नोंद आहे.
या थेट निवडणुकीत एका बाजूला कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही हजार रुपयांवर समाधान मानणारा अपक्ष उमेदवार, अशा आर्थिक फरकाने ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर आर्थिकदृष्ट्या तुलना करणारी ठरली. सर्वाधिक मालमत्ता असलेले उमेदवार सौरभ पोपट पाटील यांच्या नावावर १,८०,४२,००० रुपयांची संपत्ती आहे. नव्या पिढीचा चेहरा, आर्थिक क्षमता आणि मजबूत प्रचारयंत्रणा असल्यामुळे त्यांची उमेदवारी विशेष ठरली.
दुसऱ्या स्थानावर भाजपचे उमेदवार उत्तम तायप्पा जाधव आहेत. ज्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत ८१,७८,२६९ रुपये आहे. भाजपची संघटनशक्ती आणि जाधव यांचा सामाजिक प्रभाव या आर्थिक पायावर निर्णायक ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाचे रावसाहेब शिवाजी सागर असून, त्यांच्या नावावर ४०,८२,५५० रुपयांची मालमत्ता आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये सर्वांत वेगळे ठरले अपक्ष गुरुप्रसाद अतुल कवडे. त्यांच्या नावावरची मालमत्ता केवळ ६६,००० रुपये असून, आर्थिक दृष्ट्या साधारण कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराला लोकांनी विशेष लक्ष दिले. ‘सामान्यांचा उमेदवार’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. मात्र, त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार रावसाहेब सागर यांना पाठिंबा दिला होता.
दरम्यान, नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत आटपाडीकरांनी उत्साहाने मतदान करून ७९.६२ टक्के मतदानाची नोंद केली. चारही उमेदवारांची निवड ईव्हीएममध्ये बंदिस्त झाली असून, निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
तालुक्याचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडे
मतदान पार पडले असले तरी चर्चेचा मुख्य मुद्दा अजूनही कायम आहे तो म्हणजे कोणता उमेदवार किती श्रीमंत? प्रतिज्ञापत्रांमधील तपशील समोर आल्यानंतर जनतेत निकालाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. आटपाडीकरांनी नेमकं कोणावर विश्वास ठेवला आहे, याचा निर्णय दि. २१ डिसेंबरला होणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.