शिराळा : मुलांना शिकवायला कायमस्वरूपी शिक्षकच नसतील, तर शाळेत पाठवून काय उपयोग?" असा जळजळीत सवाल करत शिराळा तालुक्यातील कोंडाईवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला असतानाच, आज मंगळवारपासून सरपंच अशोक सावंत आणि उपसरपंच संजय सावंत यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंत वर्ग असूनही केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. यातील एक शिक्षिका मुख्यमंत्री योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात असून, त्यांची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ४२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे. याच कारणामुळे पालकांनी बुधवार, १७ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे.आज उपोषण सुरू होताच गटशिक्षणाधिकारी पोपट मलगुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. "१५ ऑक्टोबरपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक देतो, आपण उपोषण मागे घ्यावे," असे आश्वासन दिले. मात्र, आधी नियुक्ती करा, मगच उपोषण मागे घेऊ, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.आज उपोषणस्थळी श्रीपती पडवळ, संदीप सावंत, पै. कुमार सावंत, रामचंद्र सावंत, कविता सावंत, सविता धुळप, अश्विनी सावंत, सविता पाटील, पार्वती सावंत आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
ग्रामीण व डोंगरी भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जर शाळेत दोन तीन वर्गांसाठी एकच शिक्षक असतील तर या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? तीन चार वर्षांपासून आम्हाला मागणी करूनही शिक्षक मिळत नाही. कायमस्वरूपी शिक्षक नेमणूक होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही. - अशोक सावंत, सरपंच