सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:47 IST2025-11-10T14:46:58+5:302025-11-10T14:47:32+5:30
Sangli Blast news: गॅस गळती किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता; घटनेनंतर विटा शहरात हळहळ व्यक्त.

सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
- दिलीप मोहिते
विटा (जि. सांगली) : येथील एका भांडी व फर्निचर दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन महिलांसह एक पुरूष व एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. विष्णू पांडूरंग जोशी (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (वय ४५), त्यांची विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (वय २८) व नात सृष्टी इंगळे (वय ३, सर्व रा. सावरकरनगर, विटा) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. सुदैवाने विष्णू यांची दोन मुले मनीष (वय २५) व सूरज (वय २२) हे प्रसंगावधान राखून गॅलरीतून बाहेर पडल्याने बचावले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विटा येथे घडली.
विटा येथील सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर हे भांडी व फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानात खालील भागात भांडी, पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचर, गादीचे साहित्य व त्यावरील मजल्यावर जोशी कुटुंब राहण्यास आहे. या दुकानात आतील बाजूस जीना असून या जीन्यातून हे कुटुंब वरील दोन्ही मजल्यावर ये-जा करत होते.
सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या आतील बाजूस अचानक आग लागली. त्यावेळी दुकानाचे दोन्ही शटर आतून बंद होते. तर जोशी कुटुंबातील सहा सदस्य वरील मजल्यावर होते. ही आग झपाट्याने पसरली. त्यावेळी रस्त्याने ये-जा करणाºया लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. परंतु, भांड्याच्या दुकानात आग लागल्याने जोशी कुटुंबातील लोकांना जीन्यावरून बाहेर पडता आले नाही.
तरीही तरूणांनी शेजारच्या इमारतीच्या टेरेसवरून आतील गॅलरीमधून मनीष (वय २५) व सूरज (वय २२) या दोन भावांना बाहेर घेतले. मात्र, विष्णू, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी प्रियांका इंगळे व तीन वर्षाची सृष्टी इंगळे यांना बाहेर पडता आले नाही. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून इमारतीच्या दुसºया मजल्यावर प्रवेश केला होता.
तरूणांनी भिंतीला भगदाड पाडून आतून लोकांना बाहेर घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीत विष्णू, सुनंदा, प्रियांका व सृष्टी या चिमुकलीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विटा, कडेगाव, पलूस, तासगाव, कुंडल येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. शेकडो तरूणांचे हात मदतीसाठी सरसावले होते. आ. सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी स्वत: घयनास्थळी थांबून घरात अडकलेल्या जोशी कुटुंबियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक नागरीक, तरूण आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या परिश्रमातून ही आग आटोक्यात आली.या घटनेने विटा शहर हादरले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. खा. विशाल पाटील, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.