Sangli ZP Election 2026: पराभवाने न खचता ‘महाडिक पॅटर्न’ पुन्हा जोमात उभा राहील - राहुल महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:25 IST2026-02-11T19:23:11+5:302026-02-11T19:25:38+5:30
येलूर गटातील पराभवानंतरही कार्यकर्त्यांत उत्साह; निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून सक्रिय

Sangli ZP Election 2026: पराभवाने न खचता ‘महाडिक पॅटर्न’ पुन्हा जोमात उभा राहील - राहुल महाडिक
अशोक पाटील
ईश्वरपूर : जिल्हा परिषद आणि वाळवा पंचायत समितीच्या राजकारणात पेठ नाक्यावरील ‘महाडिक पॅटर्न’ने सलग ३५ वर्षे दबदबा राखला आहे. येलूर जिल्हा परिषद गटासह परिसरातील अनेक ग्रामपंचायतींवर आजही महाडिक गटाचे वर्चस्व कायम आहे. मात्र यावेळी जिल्हा परिषद गटात पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यामुळे आपण खचणार नसून निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली आहे, अशी ठाम भूमिका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
राहुल महाडिक म्हणाले, दिवंगत नानासाहेब महाडिक यांनी दोनवेळा विधानपरिषद निवडणूक पराभूत होऊनही जिल्ह्याच्या राजकारणातील आपला दबदबा कमी होऊ दिला नाही. यावेळी झालेला पराभव जिव्हारी लागणारा असला, तरी तोच पराभव आगामी काळातील राजकारणासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जनतेशी नाते अधिक घट्ट करून पुन्हा मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाडिक घराण्याच्या राजकीय प्रवासाची सुरुवात वर्ष १९९० मध्ये झाली. दिवंगत नानासाहेब महाडिक यांनी वाळवा पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकत ‘मिनी मंत्रालय’च्या राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर पेठ नाक्यावरील महाडिक घराण्याने मागे वळून पाहिले नाही. १९९६ मध्ये येलूर जिल्हा परिषद गटातून मीनाक्षी महाडिक प्रथमच निवडून आल्या. वर्ष २००२ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून सलग दहा वर्षे जिल्हा परिषदेत प्रभावी भूमिका बजावली.
२००७ मध्ये मी येलूर जिल्हा परिषद गटातून विजय मिळवत महाडिक गटाची ताकद अधिक भक्कम केली. २०१२ मध्ये मीनाक्षी महाडिक निवडून आल्या, तर त्याच वेळी पेठ जिल्हा परिषद गटातून सम्राट महाडिक विजयी झाले. त्यामुळे एकाच वेळी घरातील दोन सदस्य ‘मिनी मंत्रालयात’ कार्यरत होते. यावेळचा पराभव तात्पुरता असून महाडिक पॅटर्नचे राजकारण अजून संपलेले नाही, हे येणाऱ्या काळात दिसून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी व्यक्त केला.
महाडिक पॅटर्नचा राजकीय प्रवास
- १९९० : नानासाहेब महाडिक अपक्ष म्हणून वाळवा पंचायत समितीत विजयी
- १९९६ व २००२ : मीनाक्षी महाडिक येलूर जिल्हा परिषद गटातून सलग विजय
- २००७ : राहुल महाडिक येलूर जिल्हा परिषद गटातून निवडून
- २०१२ : मीनाक्षी व सम्राट महाडिक एकाच वेळी जिल्हा परिषदेत
- २०१७ : राहुल महाडिक वाळवा पंचायत समितीत विरोधी पक्षनेते
- सलग ३५ वर्षे ‘मिनी मंत्रालयात’ महाडिक पॅटर्नचा दबदबा