सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड बुधवारी (ता. १८) होणार आहे. त्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरल्याने राजकीय पक्षांमध्ये बहुमताच्या जुळणीसाठी धावाधाव सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सोमवारी (दि. २) जाहीर केला. या विशेष सभेचे अध्यासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अर्जांची छाननी होईल. माघार घेण्यासाठी एक वाजेपर्यंतची मुदत आहे. दुपारी दोन वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंचे संख्याबळ अत्यंत काठावर आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या युतीतील घटक पक्षांचा पाठिंबा गृहीत धरला, तरच भाजपचे संख्याबळ ३१ पर्यंत जाते. पण हे दोन्ही पक्ष तूर्त अध्यक्षपदावर अडून आहेत. सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हादेखील सत्तास्थापनेसाठी आक्रमक भूमिकेत आहे. काँग्रेसला सोबत घेतल्यास त्यांचे संख्याबळ २९ होते. त्यांना बहुमतासाठी अवघ्या तीन जागांची आवश्यकता आहे. अजित पवार गटाने बैठकांमधून पाठिंब्याविषयी आघाडीच्या बाजूनेच भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपला उठाबशा काढाव्या लागत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थापनेबाबत सावध भूमिका व्यक्त केली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ‘आमचाच अध्यक्ष होणार’ या आक्रमक भूमिकेत असलेल्या भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचे ‘जिल्हा परिषदेत आम्ही वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत’, असे वक्तव्य केले आहे. ते आता चर्चेचे ठरले आहे.‘बहुमतासाठीचे संख्याबळ जमवताना भाजपची दमछाक होत आहे का?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सांगलीत शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी सत्तास्थापनेविषयी भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सत्तेसाठी प्रत्येक पक्षाची अपेक्षा स्वाभाविक आहे.’
भाजपने दिलेला त्रास ठरतोय अडचणीचा मुद्दाजिल्ह्यातील एका भाजप नेत्याने निवडणुकीदरम्यान दिलेला त्रास पक्षाला सत्तास्थापनेत त्रासदायक ठरत असल्याची चर्चा आहे. किंबहुना गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागातील नेत्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेने केली आहे.
मिरजेत पालकमंत्र्यांसोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी ही तक्रार स्पष्टपणे मांडली होती. ‘निवडणुकीत झालेला त्रास कसा विसरायचा?’ या त्यांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते. बाबर यांचे सात सदस्य असल्याने त्यांचा प्रश्न भाजपला गांभीर्याने घ्यावा लागत आहे.