सांगली जिल्हा परिषद गट, गणांची सोमवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:38 IST2025-10-10T18:38:05+5:302025-10-10T18:38:39+5:30
पंचायत समित्यांची तालुक्याच्या ठिकाणी सोडत निघणार

सांगली जिल्हा परिषद गट, गणांची सोमवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष
सांगली : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत सोमवार, दि. १३ रोजी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार, जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर दहा पंचायत समित्यांच्या १२२ गणांची आरक्षण सोडत संबंधित तहसीलदार यांच्या स्तरावर काढण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह आरक्षण सोडत दि. १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेला हजर राहायचे आहे, त्यांनी संबंधित ठिकाणी विहित वेळेत हजर राहावे, असे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट असून, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह येथे सभा होणार आहे.
पंचायत समितीनिहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे : आटपाडी ८ गणांची सोडत पंचायत समिती सभागृहात होणार आहे. जत १८ गण असून, तहसील कार्यालय जतच्या आवारातील तलाठी भवन. खानापूर ८ गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव ८ गण, बैठक सभागृह, तहसील कार्यालय, तासगाव १२ गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ ८ गण, आर. आर. (आबा) पाटील सभागृह. पलूस ८ गण, तहसील कार्यालय. वाळवा २२ गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर. शिराळा ८ गण, प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. मिरज २२ गण, वसंतरावदादा पाटील सभागृह, पंचायत समिती येथे आरक्षण सोडत निघणार आहे.
पंचायत समिती सभापतींची आज आरक्षण सोडत
जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमधील सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.