सांगली ते मुंबई शहीद दौड उद्यापासून, शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी देशातील एकमेव मॅरेथॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:32 IST2022-11-21T14:31:36+5:302022-11-21T14:32:14+5:30
या दौडमध्ये मुंबईचे अपर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंगल सहभागी होणार

सांगली ते मुंबई शहीद दौड उद्यापासून, शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी देशातील एकमेव मॅरेथॉन
सांगली : मुंबईत २६/११ मधील दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या शहीद पोलिस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगलीतील शहीद अशोक कामटे फाउंडेशनने सांगली ते मुंबई दौडचे आयोजन केले आहे. दि. २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत दौड निघणार आहे.
फाउंडेशनच्या वतीने गेली १२ वर्षे सांगलीत इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे. २०२१ पासून सांगली ते मुंबई अशी ४७० किलोमीटरची दौड सुरू करण्यात आली आहे. यंदा २२ नोव्हेंबर रोजी सांगलीतून दौडला प्रारंभ होणार आहे. यात मशाल व तिरंगा हाती घेत २५ धावपटू सहभागी होणार आहेत. सांगली, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई अशा मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड २६ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे.
मातृभूमीचे रक्षण करून स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पराक्रमाची व त्यागाची गाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी, हा या दौडचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रवींद्रकुमार सिंगल सहभागी होणार
सांगलीत मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता शहीद अशोक कामटे चौकातून स्थानिक शहीद दौडला सुरुवात होणार असून, राम मंदिर येथे दौडचा समारोप होणार आहे. यावेळी स्थानिक धावपटूंचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईची शहीद दौड सुरू होणार आहे. सांगलीतील या दौडमध्ये मुंबईचे अपर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंगल सहभागी होणार आहेत.