सव्वादोन महिन्यातच शिक्षक बँक अध्यक्षांचा राजीनामा, रूपाली गुरव यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:11 IST2025-10-25T19:11:18+5:302025-10-25T19:11:40+5:30
अन्य संघटनांना संधी कधी मिळणार?

सव्वादोन महिन्यातच शिक्षक बँक अध्यक्षांचा राजीनामा, रूपाली गुरव यांची बिनविरोध निवड
सांगली : प्राथमिक शिक्षकबँकेचे अध्यक्ष संतोष जगताप यांचा सव्वादोन महिन्यातच राजीनामा घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्षपदी रूपाली अविनाश गुरव यांना संधी मिळाला आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेत ११ संघटनांची आघाडी झाली होती. चुरशीच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), प्राथमिक शिक्षक संघ (शि. द. पाटील गट), जुनी पेन्शन संघटना ११ संघटनांच्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाने स्पष्ट बहुमत मिळविले. यानंतर स्वाभिमानी शिक्षक मंडळाचे नेते विनायक शिंदे यांनी शिक्षक बँकेच्या अध्यक्षपद भूषवले. जवळपास तीन वर्षे ते अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी शिक्षक बँकेसाठी नवीन जागा आणि इमारत बांधल्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये राजीनामा दिला होता.
त्यानंतर संतोष जगताप यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. जगताप यांचा तीन महिन्यांचाही कालावधी पूर्ण झाला नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला. तसेच शुक्रवारी नूतन अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा झाली. यावेळी सहायक निबंधक अरविंद कोळी निवडणूक निर्णय अधिकारी होते. एकच अर्ज दाखल झाल्याने रूपाली गुरव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अन्य संघटनांना संधी कधी मिळणार?
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत ११ संघटनांनी एकत्रित येत स्वाभिमानी शिक्षक मंडळाची स्थापना केली होती. या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मंडळाने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता मिळविले होते. यामध्ये प्राथमिक शिक्षक संघ - शि. द. पाटील आणि जुनी पेन्शन संघटनांचे प्रत्येकी दोन संचालक विजय झाले होते. या संघटनांच्या संचालकांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.