घनशाम नवाथेसांगली : अवघा सहा महिन्यांचा असतानाच तो पोलिस दलात गुन्हे शोध पथकात दाखल झाला. ‘हॅन्डलर’ शबाना अत्तार यांनी खूपच लळा लावला. त्याला लहान मुलाप्रमाणे खेळवत होत्या. दररोज त्याच्याशी गप्पागोष्टी करायच्या. सोमवारी रात्री त्याची तब्येत अचानक बिघडली. शबाना या पंढरपूरला गेल्या होत्या. दुसऱ्या सहकाऱ्यांनी शबाना यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांनी ‘कूपर काय झाले रे बाळा’ असा प्रश्न विचारला. ओळखीचा आवाज ऐकून कूपरने एकदा मोबाइलकडे बघितले अन् शेवटची मान खाली टाकली. दीड तासात त्या पंढरपूरहून सांगलीत आल्या. परंतु कूपरचा इथला प्रवास थांबला होता.६ ऑगस्ट २०१९ ला कूपरचा जन्म झाला. सहा महिन्यानंतर तो पोलिस दलात आला. हॅन्डलर शबाना अत्तार यांनी त्याच्याबरोबर दहा महिने पुणे येथे प्रशिक्षण घेतले. अवघा सहा महिन्यांचा असल्यापासून तो शबाना यांच्या मांडीवर लहान मुलाप्रमाणे येऊन खेळायचा. मोठा झाल्यावर मांडीवर बसता येत नसले तरी तो एका मांडीवर येऊन बसायचा. लहान मुलाप्रमाणे त्या खेळत होत्या. कूपरचे ‘हॅन्डलर’ एस.एल. भोरे आणि शबाना अत्तार यांच्यावर त्याची जबाबदारी होती.‘कूपर’ अल्पावधीतच सांगली पोलिस दलाची शान बनला होता. शबाना यांनी तर त्याच्यावर घरच्या सदस्याप्रमाणे जीव लावला होता. सांगलीत त्या एकट्याच राहत होत्या. परंतु त्यांनी कूपरला स्वत:च्या घरचा सदस्यच मानले होते. रात्री-अपरात्री कूपरचा विचार आल्यानंतर त्या थेट श्वान पथकाच्या कार्यालयात येऊन त्याची भेट घेत असत. दिवसभर त्यांचा वेळ कूपर बरोबर जायचा. कूपरने अनेक गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना माग दाखवला होता.
सोमवारी शबाना या पंढरपूर येथे गावाकडे गेल्या होत्या. हॅन्डलर भोरे यांच्यावर कूपरची जबाबदारी होती. सकाळीच कूपरची तब्येत बिघडली. भोरे यांना तर काहीच सूचत नव्हते. पशुवैद्यकांना दाखवले होते. परंतु कूपरला त्याचा इथला प्रवास संपल्याची जणू जाणीवच झाली होती. शेवटच्या घटका मोजत तो निपचीत पडून होता.भोरे यांना तर खूपच गलबलून आले होते. बोलताच येत नव्हते. रात्री पावणेआठच्या सुमारास दुसऱ्या एका सहकाऱ्याने शबाना यांना व्हिडिओ कॉल करून सर्व हकीकत कळवली. व्हिडिओ कॉलवर कूपरला निपचीप पडल्याचे पाहून त्यांनी ‘कूपर काय झाले रे बाळा’ अशी साद घातली. तो आवाज कानावर पडताच कूपरने मान वर करून एकदाच मोबाइलकडे बघितले अन् मान खाली घातली.शबाना यांनी भावाला सांगून तत्काळ सांगलीकडे प्रयाण केले. दीड तासात त्या सांगलीत आल्या. तेव्हा कूपर कायमचा सोडून गेल्याचे दिसताच, त्यांना हुंदकाच फुटला. त्यांचा जीवाभावाचा कूपर कायमचा सोडून गेल्याचे पाहून त्या धायमोकलून रडू लागल्या. सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना आवरले. मंगळवारी कूपरला मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही कूपरच्या आठवणीचा हुंदका त्यांच्याशी बोलताना जाणवतो.
वेळ द्यायला हवा होता..कूपरविषयी भावना व्यक्त करताना शबाना यांना गलबलून आले. हुंदका आवरतच त्या म्हणाल्या, ‘कूपर’ने अचानक सोडून जाण्याचे वयच नव्हते. आम्हाला त्याने वेळ द्यायला हवा होता. त्याचा आजार माहीत असता तर त्याला काहीही करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले असते. परंतु त्याने आम्हाला वेळच दिला नाही. आता फक्त आठवणीच उरल्या आहेत. त्याचे छोटेसे स्मारक व्हावे एवढीच इच्छा आहे.