Sangli Municipal Election 2026: जागांच्या आकड्यांबाबत कोणीही आग्रही राहू नये, चंद्रकात पाटील यांची मित्रपक्षांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:52 IST2025-12-20T18:50:45+5:302025-12-20T18:52:16+5:30
..त्यानंतर जागा व उमेदवार निश्चित होतील

Sangli Municipal Election 2026: जागांच्या आकड्यांबाबत कोणीही आग्रही राहू नये, चंद्रकात पाटील यांची मित्रपक्षांना सूचना
मिरज : भाजपसह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे उमेदवार हे मेरिटवर ठरणार आहेत. त्यामुळे जागांच्या आकड्यांबाबत कोणीही आग्रही राहू नये, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना केली.
भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी शहर जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यानंतर भाजप महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केली. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, पक्ष निरीक्षक अतुल भोसले, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर, मोहन वनखंडे, संजय विभुते, रावसाहेब घेवारे व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेसाठी १६ उमेदवारांची यादी भाजपकडे दिली. निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी निश्चित होणार आहे. उमेदवारीबाबत दोन दिवसात पुन्हा स्थानिक नेत्यांची चर्चा केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महादेव कुरणे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. ८ जागा पक्षाला मिळाव्यात, अशी मागणी समित कदम यांनी केली. दरम्यान, उमेदवारीबाबत भाजपचे शेखर इनामदार व जनसुराज्यचे महादेव कुरणे यांच्यात दोन दिवसात चर्चा होईल. त्यानंतर जागा व उमेदवार निश्चित होतील, असे सांगण्यात आले.
आरपीआय आठवले गटाचे नेते माजी सभापती जगन्नाथ ठोकळे, नेते संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आरपीआयला ८ जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. दरम्यान निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवार निश्चित करू, असा निर्णय झाला.