कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:58 IST2025-09-24T15:55:27+5:302025-09-24T15:58:16+5:30
आयुक्तांचा दणका

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
सांगली : महापालिकेतील ठाणेदारांना दणका दिल्यानंतर आता आयुक्त सत्यम गांधी यांनी कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.
तर नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येक दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयुक्तांच्या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थान विभागाचा पदभार डाॅ. ताटे यांच्याकडे होता. त्याकाळात त्यांनी दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून त्यांची घनकचरा विभागातून उचलबांगडी करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे मुख्य उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
उद्यान विभागाकडील देखभालीच्या अनुषंगाने दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल दुरुस्ती व दैनंदिन कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे मंथन करणेबाबत सूचना देऊनही डॉ. ताटे यांच्याकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. यावरून त्यांचे कामकाज असमाधानकारक असून त्यांच्या सोपवलेल्या पदाची जबाबदारी, कार्य कर्तव्य ते सक्षमपणे पार पाडत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.
त्यांची वर्तणूक गंभीर स्वरुपाची, नियमबाह्य व शिस्त भंगाची असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार ते कारवाईस पात्र असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दैनंदिन पाहणी करून अशा बांधकामावर दंडात्मक कारवाई करावी. ही बांधकामे नियमित करावीत. याबाबतचे दैनंदिन उद्दिष्ट देत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्तांनी दिला होता.
शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवा
आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला. यात कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन तत्वावर पालिकेच्या सेवेत आहेत. महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.