सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:02 IST2026-03-28T19:01:31+5:302026-03-28T19:02:18+5:30

महासभा तहकूब, एक एप्रिलला होणार चर्चा

Sangli Municipal Corporation presents budget of Rs 1173 crore | सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ 

सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ 

सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता २०२६-२७ या वर्षाचा १ हजार १७३ कोटी ६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. यात क्रीडांगणाचा विकास, मोक्यांच्या जागी फुडपार्क, मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी, साई व शिवसृष्टी, वाचनालय, भाजी मंडई, संग्रहालय अशा विविध योजनांची खैरात करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सदस्यांना तीन ते चार दिवसांचा कालावधी द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केली. त्यानुसार महापौर सूर्यवंशी यांनी आजची सभा तहकूब करीत १ एप्रिल रोजी अर्थसंकल्पावर चर्चेसाठी सभा घेण्याचे जाहीर केले.

स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी महापालिकेचे २०२६-२७ चे बजेट सर्वसाधारण सभेला सादर केले. आयुक्त सत्यम गांधी १ हजार ६५ कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात ९३ कोटीची वाढ करून १,१७३ कोटी जमेचे, १११६ कोटी खर्चाचे व ४६ कोटी ३० लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मांडला.

घरपट्टीच्या उत्पन्नात १६.६६ कोटी, नगररचना २.७५ कोटी, रस्ते, चर दुरुस्ती १४ कोटी, जमीन व बिनशेतीसारा मुद्रांक अनुदान १ कोटी, खुल्या जागांपासूनचे उत्पन्न १ कोटी, मीटरने पाणी पुरविलेला आकार ६ कोटी यासह मक्तेदार नोंदणी शुल्क, जलसिंचन शुल्क, प्रवेश फी, विलंब आकार, रस्ता खुदाई आकार यातून ४४.६० कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. तसेच अमृत ३.० योजनेतून ५० कोटींचे अनुदान अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात काय?

क्रीडांगणासाठी ८.९० कोटी
शहरात नवीन क्रीडांगण विकसित करण्यासह खेळाडूंना सोयी-सुविधा देण्यासाठी ८ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील ११ एकर जागेत नवीन क्रीडांगण उभारण्याचा संकल्प केला आहे.

शहरात व्यसनमुक्ती केंद्र
महापालिका क्षेत्रातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. तरुणाईला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी शहरात व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मदनभाऊ महाकरंडक नाट्य स्पर्धा
महापालिकेच्यावतीने २०१६ पासून दिवगंत मदनभाऊ पाटील महाकरंडक नाट्य स्पर्धा घेतली जात होती. पण प्रशासकीय काळात या स्पर्धेला ब्रेक लागला होता. आता पुन्हा ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून त्याच्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून संग्रहालय
सध्या सांगलीत एक संग्रहालय आहे. आता महापालिकेच्यावतीने नवीन संग्रहालय उभारले जाणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांचे कार्य समाजसमोर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.

तिन्ही शहरात भाजी मंडई
सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराच्या विस्तारित भागात भाजी मंडई उभारली जाणार आहे. मंगळवार बाजार, कुपवाडमधील मदनभाऊ आरोग्य केंद्राजवळ आणि मिरजेतील पंढरपूर रोड येथे भाजीमंडई विकसित करण्यात येईल.

साईसृष्टी व शिवसृष्टी
शहरातील चाणक्यपुरी येथील एक एकर जागेत साईसृष्टी तर लक्ष्मी मंदिर परिसरातील अजिंक्य सोसायटीच्या अर्धा एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

मोक्याच्या जागेवर फुडपार्क, शाॅपिंग काॅम्पलेक्स
शहरातील ८० व शंभरफुटी रस्त्यालगतच्या मोक्याच्या जागी फुडपार्क उभारण्यात येईल. तसेच हरभट रोड, कोल्हापूर रोड, माधवनगर रोड व विश्रामबाग चौकात शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारण्यासाठी २ कोटींची तरतूद केली आहे.

चार ठिकाणी स्वागत कमानी
महापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चारही रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title : सांगली महानगरपालिका बजट: योजनाओं की घोषणा, 93 करोड़ की वृद्धि।

Web Summary : सांगली महानगरपालिका के बजट में खेल के मैदान, फूड पार्क, पुस्तकालय और संग्रहालय जैसे विकास प्रस्तावित हैं। कोई नया कर प्रस्तावित नहीं है। बजट में 93 करोड़ की वृद्धि हुई, जिसमें सांगली, मिरज और कुपवाड में बुनियादी ढांचे और सांस्कृतिक परियोजनाओं पर ध्यान केंद्रित किया गया है।

Web Title : Sangli Municipal Corporation Budget: Plans announced, 93 crore increase.

Web Summary : Sangli Municipal Corporation's budget proposes developments like sports grounds, food parks, libraries and museums. No new taxes are proposed. The budget increased by 93 crores, focusing on infrastructure and cultural projects across Sangli, Miraj, and Kupwad.