जन्म देताच आईनं झिडकारलं... पण, सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मातृत्व दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:24 IST2026-03-26T16:24:06+5:302026-03-26T16:24:25+5:30

बारसं घालून ‘वीरप्रताप’ नावही दिलं

Sangli government hospital staff offered maternity leave after mother abandoned newborn baby | जन्म देताच आईनं झिडकारलं... पण, सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मातृत्व दिलं

जन्म देताच आईनं झिडकारलं... पण, सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मातृत्व दिलं

सांगली : जग दाखविणाऱ्या आईनेच जन्मजात बाळाला शासकीय रुग्णालयात बेवारस सोडून दिलं. शोध घेऊनही माता सापडली नसल्याने येथील परिचारिका अन् कर्मचाऱ्यांनी त्याला मातृत्व दिलं. तीन महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला. लेकरांसारखं प्रेम केलं, इतकंच नाही तर रुग्णालयातच थाटात बारसं घालून त्याला ‘वीरप्रताप’ हे नावही दिलं.

न्यायालयीन आदेशामुळे पुण्यातील बाल कल्याण समितीकडे त्याला सुपूर्द करण्याची वेळ येताच सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुन्हा एकदा हे बाळ नव्या पालकत्वाच्या दिशेनं निघून गेलं.

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५ रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी आई बाळाला सोडून निघून गेली. आईचा शोध अपयशी ठरला. त्यातच बाळ शारीरिकदृष्ट्या नाजूक असल्याने त्या बाळाचा सांभाळ तेथीलच स्टाफने सुरू केला. तब्बल १५ दिवस बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

यादरम्यान बाळाला हर्निया झाल्याचेही समोर आले. त्यावर ऑपरेशनसुद्धा करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत हे बाळ सांगली शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू दक्षता केंद्रातील कर्मचारी सांभाळत होते. तीन महिने त्याचा सांभाळ केल्यानंतर न्यायालयीन आदेशाने त्याला पुणे येथील बाल कल्याण समितीकडे पाठविण्याची तयारी झाली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी बुधवारी सुपूर्द केले.

पाळणा सजला, नामकरण सोहळा रंगला

सर्व नर्सिंग स्टाफने बाळाच्या नामकरणाची तयारी केली. पाळणा सजवण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या. फुले अन् फुग्यांनी सजावट करण्यात आली. बाळासाठी पाळणाही म्हटला गेला. आईविना पोरक्या झालेल्या बाळाचे नाव सर्वांनी मिळून ‘वीरप्रताप’ ठेवले.

Web Title : जन्म के बाद त्यागा, सांगली अस्पताल के कर्मचारियों ने परिवार बने।

Web Summary : सांगली अस्पताल में माँ द्वारा त्यागे गए बच्चे की देखभाल कर्मचारियों ने की। उन्होंने उसका नाम वीरप्रताप रखा और उसका जन्म मनाया। तीन महीने बाद, उसे अदालत के आदेशानुसार पुणे बाल कल्याण समिति को सौंप दिया गया।

Web Title : Abandoned at birth, hospital staff in Sangli became his family.

Web Summary : A baby abandoned by his mother at Sangli hospital was cared for by staff. They named him Virpratap and celebrated his birth. After three months, he was handed over to a Pune child welfare committee by court order.