सांगली : विट्याजवळ टॅँकर-ट्रकच्या धडकेत तिघे ठार-अपघातानंतर भीषण आग : मृतांची संख्या वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:23 IST2018-12-22T18:18:31+5:302018-12-22T21:23:36+5:30
विट्याजवळ मायणी रस्त्यावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यामध्ये दोन्ही वाहनांमधील तिघे होरपळून ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी

सांगली : विट्याजवळ टॅँकर-ट्रकच्या धडकेत तिघे ठार-अपघातानंतर भीषण आग : मृतांची संख्या वाढण्याची भीती
सांगली : विट्याजवळ मायणी रस्त्यावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यामध्ये दोन्ही वाहनांमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता नागेवाडी (ता. खानापूर) गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चिखलहोळ हद्दीत घडली. दरम्यान, अपघातानंतर भीषण स्फोट झाल्याने सुमारे तीन किलोमीटरचा परिसर हादरून गेला. विटा आणि तासगाव पालिकेच्या अग्निशमन पथकांनी आग आटोक्यात आणली.
दरम्यान, अपघातात जळून खाक झालेले तीन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये आणखी दोन ते तीनजणांचा होरपळून मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. टॅँकर (क्र. केए २२ डी ३३०४) विट्याकडून मायणीकडे जात होता, तर मायणीहून बिस्कीट भरून ट्रक (एमएच १२ एलटी ००६१) विट्याच्या दिशेने येत होता. चिखलहोळ हद्दीत सिमेंटपोल फॅक्टरीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघातानंतर क्षणार्धात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामुळे ट्रकमधील चालक व क्लीनरला बाहेर पडता आले नाही.
अपघातानंतर स्फोट होऊन आगीचा भडका उडाल्याने सुमारे तीन किलोमीटरचा परिसर हादरून गेला. घटनास्थळी आगीचे प्रचंड लोळ उठले. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलीस तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विटा व तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाने सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आग आटोक्यात आल्यानंतर पूर्णपणे जळालेल्या स्थितीतील तीन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र आगीत आणखी दोन ते तीनजणांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याने मृत व्यक्तींची ओळख पटू शकली नव्हती. अपघातानंतर विटा-मायणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.