सांगली जिल्ह्याचा ७४५ कोटींचा आराखडा मंजूर; कासेगाव, कुरळप येथे ग्रामीण रुग्णालय होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:49 IST2025-02-03T12:49:03+5:302025-02-03T12:49:52+5:30
नियोजन समितीची बैठक, शिराळा, कासेगावमध्ये ट्रामा केअर सेंटर

सांगली जिल्ह्याचा ७४५ कोटींचा आराखडा मंजूर; कासेगाव, कुरळप येथे ग्रामीण रुग्णालय होणार
सांगली : सांगलीत रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ७४४ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तो ७ फेब्रुवारी रोजीच्या राज्यस्तरीय समितीत सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, इद्रिस नायकवडी, सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील यांच्यासह पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, नियोजन अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या वर्षासाठी एकूण ५७३ कोटींचा आराखडा मंजूर होता. जानेवारीअखेर २४० कोटी ५८ लाख रुपये शासनाकडून मिळाले. त्यापैकी १९० कोटी ८४ लाख रुपये खर्च झाला आहे. सर्व विभागांनी काटेकोर नियोजनाने नियोजन समितीचा निधी विहित मुदतीत खर्च करावा.
पाटील यांनी सांगितले की, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय व सीटी स्कॅन मशीन, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ४ कोटी १३ लाख खर्चून सौर प्रकल्प, तुरची येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात १ कोटी ८२ लाखांचा सौर प्रकल्प कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. नियोजन समितीतील कामांचा आढावा दर महिन्याला घेण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी वन विभागाने प्रस्ताव तयार करावा. वन विभागाच्या परवानगीसाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल.
शिराळा, कासेगाव येथे ट्रामा केअर सेंटर
दरम्यान, शिराळा व कासेगाव (ता. वाळवा) येथे नवीन ट्रामा केअर सेंटर उभारण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. कासेगाव व कुरळप (ता. वाळवा) येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करणे, सुखवाडी (ता. पलूस), हिवरे (ता. जत) व पाडळी (ता. तासगाव) येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली.
एलसीबी पथकाला बक्षीस
विटा येथे अमली पदार्थांचा साठा पकडणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पालकमंत्री पाटील यांनी ४० हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षीस दिले. निरीक्षक सतीश शिंदे यांनी ते स्वीकारले.
आमदारांच्या मागण्या
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, सांगली मिरजेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालय उभारावे, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी उपाय करावेत, अखंडित वीजपुरवठा द्यावा, वन्यजीव हल्ल्यांपासून बचावासाठी उपाय करावेत.
ठाणेदार पोलिसांची उचलबांगडी करणार
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ठिय्या मारून असलेल्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील. अशा पोलिसांची यादी करणार आहे. पोलिस विभागाने आपल्या मागण्यांची यादी माझ्याकडे दिली आहे.
परवानगीशिवाय पुतळा नाही
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात कोठेही सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात येणार नाही. आटपाडी येथील पुतळाही परवानगीनंतरच उभारण्याची सूचना दिली आहे. तोपर्यंत तो खासगी ठिकाणी ठेवण्यास सांगितले आहे.