सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीची भाऊबीज आली!; सेविका, मदतनिसांना प्रत्येकी किती रुपये मिळणार.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:33 IST2025-10-11T16:32:26+5:302025-10-11T16:33:23+5:30
मंगळवारपासून खात्यात जमा होणार

सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीची भाऊबीज आली!; सेविका, मदतनिसांना प्रत्येकी किती रुपये मिळणार.. वाचा
सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेपोटी १ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येकी २००० रुपयांची भाऊबीज मिळणार आहे.
दरवर्षी दिवाळीनंतरच भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. पण यंदा मात्र दिवाळीपूर्वीच शासनाने पैसे देऊ केले आहेत. राज्य सरकारच्या अनेक योजना निधीअभावी रखडल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्याची तत्परता शासनाने दाखविली आहे. सांगली जिल्ह्यात २ हजार ७०३ अंगणवाडी सेविका आहेत, तर २ हजार २५० मदतनीस आहेत. एकूण ४ हजार ९५३ जणींच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहेत.
एकूण ९९ लाख ६ हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरु होती. राज्यातील एक लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना भाऊबीज देण्यात येत आहे. त्यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भाऊबीज नको, बोनस द्या
दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ‘आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या’ अशी मागणी केली होती. ‘२००० रुपयांची भेट नको, तर किमान एक वेतन बोनस म्हणून द्या’ अशी त्यांची मागणी होती. इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो, मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही? असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता. पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.