सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:57 IST2025-12-17T17:57:28+5:302025-12-17T17:57:45+5:30
बँकेतील कारभारात विनायक शिंदे यांच्या मनमानीला विरोध

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती
सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षकबँक यामध्ये २० लिपिकांच्या भरतीची प्रक्रिया बँकेचे माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी मनमानी पद्धतीने सुरू केली होती. या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती शिक्षक बँकेच्या अध्यक्षा रूपाली गुरव यांच्यासह १० संचालकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शिंदे यांचा मनमानी कारभार शिक्षक बँकेसाठी घातक असल्यामुळे आम्ही विरोध केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस नितीन चव्हाण, अमोल शिंदे, अमोल माने, कृष्णा पोळ, संजय महिंद, अशोक घागरे, राहुल पाटणे, मिलन नागणे आणि सचिन खरमाटे आदी संचालक उपस्थित होते. रूपाली गुरव म्हणाले, शिक्षक बँकेच्या भरतीत अधिकारी आणि संचालकांनाही विश्वासात घेतले नाही. शिक्षक बँक कर्मचारी उपसमिती, अधिकारी आणि संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर एकतर्फी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये अनेक त्रुटी होत्या, म्हणूनच खासगी संस्थेशी संपर्क करून भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
बँकेचे अध्यक्ष हे मंडळाचे अध्यक्ष असल्याने सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेणे अपेक्षित असले तरी विनायक शिंदे यांनी या भरतीसंबंधी अधिकार स्वत:कडे हस्तगत करण्यासाठी सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनशी बनावट कागदपत्रांसह करार केला आहे. याबाबत बँकेच्या अध्यक्षा गुरव व इतर दहा संचालकांनी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे भरती थांबवण्याची सूचना संबंधित जिल्हा नागरी बँक असोसिएशनकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटवरूनही या भरतीची जाहिरात अपलोड केली आहे.
शिंदे, अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई
दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षक बँक कर्मचारी उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी शिक्षक बँकेतील कर्मचारी भरतीला विरोध केला होता. तरीही त्यांनी बँकेच्या अध्यक्षांना आणि अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून एकाच्या सहीवर भरती प्रक्रिया चालू केली. याविरोधात विनायक शिंदे आणि संबंधित अधिकारी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा रूपाली गुरव यांसह दहा संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली.