सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:41 IST2025-08-07T16:39:34+5:302025-08-07T16:41:13+5:30
राज्यातील २८ युनिट्समधून प्रथम क्रमांक

सांगलीतील वायरलेस विभागाचा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारावकर यांनी सत्कार केला
सांगली : महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तांत्रिक कौशल्य, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासकीय सुसूत्रतेमुळे सांगली जिल्ह्याने यश संपादन केले.
अपर पोलिस महासंचालक (दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मूल्यांकनात सांगली पोलिस दलाने तांत्रिक क्षेत्रातील विविध उपाययोजनांद्वारे क्षमता सिद्ध केली. निवडणुकीच्या काळात अतिरिक्त रिपीटर उभारणी करून मुख्य नियंत्रण कक्षाशी सातत्यपूर्ण संपर्क राखण्यात आला. तसेच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयात उपलब्ध केले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यांशी तत्काळ संपर्क आणि कामकाजावर देखरेख ठेवणे सोयीचे झाले.
राज्यातील २८ युनिट्समधून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सांगली विभागाचा पुण्यातील समारंभात गौरव करण्यात आला. अपर पोलिस महासंचालक दीपक पांड्ये यांच्या हस्ते वायरलेस पोलिस निरीक्षक विष्णू कांबळे यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत निवडलेल्या चार प्रशिक्षणार्थींच्या तांत्रिक क्षमतेचाही यशात मोलाचा वाटा आहे.
अधीक्षक संदीप घुगे यांनी वायरलेस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले.