सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:57 IST2025-06-16T15:56:31+5:302025-06-16T15:57:17+5:30

वसुलीसाठी विशेष मोहीम 

Sangli District Bank's crop loan outstanding is Rs 2372 crores | सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती कर्जाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम दोन हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. जूनपर्यंत ७५ टक्के वसुली झाली असून येत्या पंधरा दिवसांत १५ टक्के वसुली वाढवण्याचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जूनअखेरपर्यंत ९० टक्केंवर वसुलीचा आकडा नेण्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जूनअखेर आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २ हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. यातील चालू वर्षी एक हजार ८८२ कोटी ७४ लाख व थकबाकी ४८९ कोटी ५७ लाख आहे. मे अखेर चालू व थकबाकी वसुलीची प्रक्रिया चालू आहे. एकूण वसूलपात्र रकमेच्या ६८ टक्के वसुली होती.

पंधरवड्यामध्ये आणखी सात ते आठ टक्के वसुली झाली असून एकूण वसुली ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. शेती कर्जाच्या वसुलीसाठी जून अखेरची मुदत असून या मुदतीत ९० टक्के कर्ज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वसुलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात बँकेचे प्रमुख अधिकारी जाऊन वसुलीचा आढावा घेत आहेत.

वसुलीसाठी विशेष पथक

वसुलीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यामार्फत वसुलीला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीत कर्ज भरून लाभ घ्यावा, अन्यथा जादा व्याजाचा भुर्दंड पडणार आहे. याशिवाय त्यांच्यावर नियम १०१ नुसार कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. सध्या वसुलीला प्रतिसाद मिळत आहे. बँकेचे अधिकारी सुटीच्या दिवशीही वसुलीच्या कामात आहेत.

शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज भरावे : मानसिंगराव नाईक

वसुलीसाठी जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. थकबाकी राहिल्यास काय फटका बसतो, याचीही माहिती ते शेतकऱ्यांना सांगत आहेत. शेतकऱ्यांनीही जादा व्याजाचा भुर्दंड बसू नये तसेच कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार नाही यासाठी मुदतीत कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

जिल्हा बँकेची आतापर्यंतची तालुकानिहाय वसुली

कडेगाव तालुका १४७ कोटी १७ लाख, वाळवा २२५ कोटी एक लाख, आटपाडी- १०८ कोटी ५६ लाख, खानापूर- ८४ कोटी ५७ लाख, शिराळा-७५ कोटी ८७ लाख, पलूस-१० कोटी ७१ लाख, मिरज-२०८ कोटी ५३ लाख, कवठेमहांकाळ-१३० कोटी ६० लाख, तासगाव-१८० कोटी ७२ लाख, आणि जत-२१५ कोटी ७० लाख.

Web Title: Sangli District Bank's crop loan outstanding is Rs 2372 crores