‘केन ॲग्रो’कडून सांगली जिल्हा बँकेला व्याजासह २२५ कोटी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:54 IST2025-03-05T15:53:11+5:302025-03-05T15:54:05+5:30
सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाचे व्याजासह अडकलेले ...

‘केन ॲग्रो’कडून सांगली जिल्हा बँकेला व्याजासह २२५ कोटी मिळणार
सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाचे व्याजासह अडकलेले २२५ कोटी रुपये वसूल होणार आहेत. कारखाना व्यवस्थापन राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) येथे पैसे भरणार आहे. न्यायप्रक्रियेकडूनच थेट जिल्हा बँकेच्या खात्यावर सात वर्षांत समान हप्त्याने पैसे भरले जाणार आहेत.
केन ॲग्रो कंपनीच्या साखर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेने ‘सरफेसी ॲक्ट’अंतर्गत कारखान्याच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. दरम्यान, कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) या कारखान्यावर ‘रिझोल्यूशन प्रोफेशनल’ (व्यावसायिक) नियुक्त केला. त्यांच्यासमोर सुनावणीवेळी बँकेने आपला दावा दाखल केला.
कारखान्याने ‘एनसीएलटी’मार्फत जिल्हा बँकेला २२५ कोटी ६८ लाख ८६ हजार रुपयांचा वसुली प्लॅन सादर केला. यावर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात चर्चा झाली. यावेळी ‘केन ॲग्रो’चे १६० कोटी रुपये मुद्दल व व्याज असा एकूण २२५ कोटी ६८ लाख ८६ हजार रुपयांचा वसुली प्लॅन अटींसह मंजूर करण्यात आला.
बँकेच्या ‘ओटीएस’ योजनेच्या धोरणानुसार व्याजात काही सवलत देण्यात आली. तसेच मुद्दलाची रक्कम १६० कोटींवर ६ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासह उर्वरित व्याज वसूल होणार आहे. ही रक्कम परतफेड करण्यासाठी पुढील सात वर्षे हप्ते पाडून देण्यात येणार आहेत. हा वसुली आराखडा ‘एनसीएलटी’ पुढे सादर करण्यात आला होता. मात्र, गेली जवळपास दोन वर्षे यावर सुनावणी सुरू होती.
नुकतीच जानेवारी २०२५ महिन्यात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत ‘एससीएलटी’ने युक्तिवाद संपवत हे प्रकरण निकालावर ठेवले. या प्लॅनच्या विरोधात दाखल केलेल्या काही याचिका यापूर्वीच ‘एनसीएलटी’ने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे हा वसुली प्लॅन एक प्रकारे मंजूर झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या मोठ्या थकबाकी वसुलीला यश आले आहे. ३१ मार्च २०२५ अखेर जिल्हा बँकेला थकबाकीचा पाहिला हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
लवकरच पहिला हप्ता जमा होईल : शिवाजीराव वाघ
केन ॲग्रो साखर कारखान्याकडील थकबाकी वसुलीचा प्रश्न सुटणार आहे. १६० कोटी रुपये कर्जाचे व्याजासह २२५ कोटी रुपये सात वर्षांत वसूल होणार आहेत. ‘ओटीएस’अंतर्गत मुद्दल परतफेडीसाठी सात वर्षांची मुदत व सहा टक्के व्याज असणार आहे. यामध्ये बँकेचा काहीही तोटा होणार नाही. मुद्दलासह बँकेला व्याजही मिळणार आहे. ३१ मार्च २०२५ अखेर जिल्हा बँकेला पहिला हप्ता मिळेल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.