शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे ३६ कोटी थकीत; वसुली मोहीम तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:45 IST2025-03-07T17:44:29+5:302025-03-07T17:45:14+5:30

जामीनदाराच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा सीईओंचा इशारा

Sangli District Bank owes 36 crores to teachers and employees | शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे ३६ कोटी थकीत; वसुली मोहीम तीव्र

शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे ३६ कोटी थकीत; वसुली मोहीम तीव्र

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३१ मार्चअखेरनिमित्ताने वसुलीचा धडाका सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांकडे ३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी काही प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यामुळे त्यांची थकबाकी वाढली आहे. या कर्जदारांच्या मालमत्तेसह जामीनदाराच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी जिल्हा बँकेकडून वकिलातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा बँकेने थकबाकी कमी करून उत्पन्न २०० कोटींपर्यंत मिळवण्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बड्या थकबाकीदारांसह शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांकडेही जुनी ३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली होऊन अन्य जिल्ह्यात गेले आहेत. यामुळे या शिक्षकांची थकबाकी वसुलीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेतीसाठीही कर्जपुरवठा केला जातो. शेती कर्जाची वसुली नियमित असली तरी वैयक्तिक आणि बिगरशेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. बॅँक कर्ज वसुलीसाठी आता बँक प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे. 

थकबाकी वसुलीवर आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांकडे ३६ कोटी थकीत असून ती वसुलीसाठी अनेक अडचणी येत आहेत. यापैकी काही शिक्षक बदली होऊन गेल्यामुळे त्यांची थकबाकी वसुली थांबली होती. या थकबाकीदारांची वसुलीसाठी जिल्हा बँकेने कर्जदाराची मालमत्ता लिलावासह जामीनदाराच्या मालमत्तेवर बाेजा चढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या थकबाकी वसुलीचे जिल्हा बँकेने नियोजन केले असून, ३१ मार्चअखेरपर्यंत कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

थकबाकीदांना नोटिसा

शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांकडे ३६ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी काही शिक्षकांची बदली झाल्यामुळे वसुलीसाठी अडचणी येत होत्या. पण, सध्या या शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांची थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. कर्जदारांचा शोध घेऊन त्यांना आणि त्यांच्या जामीनदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी कर्जाची थकबाकी भरली तर ठीक, नाही तर कर्जदार आणि जामीनदाराच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

Web Title: Sangli District Bank owes 36 crores to teachers and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.