Sangli: सात लाखांच्या लाचप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेची कारागृहामध्ये रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:10 IST2025-06-12T13:09:18+5:302025-06-12T13:10:37+5:30
बांधकाम परवान्यासाठी मागितली होती लाच

Sangli: सात लाखांच्या लाचप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेची कारागृहामध्ये रवानगी
सांगली : सांगलीतील नियोजित २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल अटक केलेला लाचखोर उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा.ग्रीन एकर्स, फ्लॅट नं. ४०३, धामणी रस्ता, सांगली) याची बुधवारी कारागृहात रवानगी केली. लाचेच्या मागणीबद्दल साबळे याची एक दिवसाची पोलिस कोठडी संपल्यामुळे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला.
तक्रारदार तानाजी रुईकर (रा.मिरज) यांच्या कंपनीने सांगलीतील एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता. परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने वरिष्ठांचे नाव सांगून १० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे रुईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. पडताळणीमध्ये उपायुक्त साबळे याने तक्रारदार रुईकर यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी दहा लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
उपायुक्त साबळे याने प्रत्यक्षात ७ लाख रुपये लाच स्वीकारली नाही, परंतु त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. तेथून साबळे याच्याविरुद्ध कारवाईचा आदेश आला. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी महापालिकेतून साबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
साबळे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. सायंकाळी साबळे याला जिल्हा कारागृहात सोडण्यात आले.
निलंबनाची कारवाई होणार
उपायुक्त वैभव साबळे याला लाच प्रकरणात अटक करून पोलिस कोठडी मिळाल्याबद्दलचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिका आयुक्तांना पाठविला जाणार आहे. तेथून हा अहवाल शासनाच्या नगररचना विभागाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर, साबळे याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.