सांगलीत चुलत भावावर अॅसिड हल्ला,रेल्वेतून उतरताच पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:39 IST2018-05-26T13:39:15+5:302018-05-26T13:39:15+5:30
भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे.

सांगलीत चुलत भावावर अॅसिड हल्ला,रेल्वेतून उतरताच पाठलाग
सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे.
सागर वावरे हा सांगली-मिरज रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. दररोज तो रेल्वेने ये-जा करतो. शनिवारी सकाळी तो रेल्वेतून विश्रामबाग स्थानकावर उतरुन हॉस्पिटलकडे चालत निघाला होता.
तेवढ्यात समोरुन त्याचा चुलत भाऊ अमोल आला. त्याने काहीही न बोलता खिशातील अॅसिडची बाटली काढून सागरवर हल्ला केला.
पायावर, हातावर, पोटावर व गळ्यावर अॅसिड पडल्याने सागर गंभीर जखमी होऊन रस्त्यावर तडफडत पडला. नागरिकांनी सागरकडे धाव घेतली. तोपर्यंत अमोल पळून गेला. नागरिकांनी सागरला उपचारार्थ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सागरवर उपचार सुरु असल्याने पोलिसांना त्याचा अजून जबाब नोंदवून घेता आलेला नाही. त्यामुळे हल्ल्यामागील निश्चित कारण समजू शकले नाही. कौटूंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.