सांगली : काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपने उरकले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:06 AM2018-11-06T01:06:49+5:302018-11-06T01:10:08+5:30

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील जवाहर हौसिंग सोसायटी ते कुपवाड फाटा या १०० फुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून सोमवारी काँग्रेसच्या ...

Sangli: Congregate in Congress; The BJP has completed the inauguration | सांगली : काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपने उरकले उद्घाटन

सांगलीत सोमवारी सह्याद्रीनगर येथील जुना बुधगाव रस्त्याच्या कामाबाबत कॉँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद उफाळून आल्याने काम सुरू करण्यास विरोध करीत नागरिकांनी जेसीबीसमोरच ठाण मांडले. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे भाजपने आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत कामाचा नामफलक झळकावला.

Next
ठळक मुद्देजुना कुपवाड रस्त्याच्या उद्घाटनाचा वाद नगरसेवकांसह नागरिकांत हाणामारी, रस्त्याच्या कामाला विरोध

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील जवाहर हौसिंग सोसायटी ते कुपवाड फाटा या १०० फुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांतच जुंपली. दोन्ही नगरसेवकांचे गट आमने-सामने आल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या कामाला विरोध करीत बारुदवाले गटाने जेसीबीसमोरच ठाण मांडले. यातून काँग्रेस समर्थकांतच जोरदार वादावादी होऊन नागरिकांत हाणामारीही झाली. एकीकडे काँग्रेसचा गोंधळ सुरू असताना, दुसरीकडे भाजपने मात्र रस्त्याच्या कामाचे उद््घाटन उरकून काँग्रेसवर कडी केली.

सह्याद्रीनगर येथील शंभरफुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून गेल्या तीन वर्षापासून वाद सुरू आहे. या रस्त्याचे काम करण्यास काही नागरिकांमधून विरोध सुरू होता. येथील ४२ मालमत्ताधारकांनी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात दावाही दाखल केला होता.
चार दिवसांपूर्वी या नागरिकांनी हा दावा मागे घेतला आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना नगरसेवक संतोष पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण न्यायालयीन वादामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. अखेर संबंधित मालमत्ताधारकांनी दावा मागे घेतल्याने सोमवारपासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार होते. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील हे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत असताना, या प्रभागातील भाजपच्या अतुल माने, सुशील हडदरे यांनीही नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाच्या उद््घाटनाचा कार्यक्रम निश्चित केला होता.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदार जेसीबीसह आला असताना काँग्रेसच्या नगरसेविका मदिना बारूदवाले यांचे पती ईलाही बारूदवाले हे समर्थकांसह तेथे आले. त्यांनी, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यास विरोध केला. बारुदवाले समर्थकांनी जेसीबीसमोरच ठाण मांडले. याचवेळी नगरसेवक संतोष पाटील यांचे समर्थक जमा झाले.

दोन्ही गट आमने-सामने आल्याने जोरदार वादावादी झाली. दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तणाव वाढू लागताच विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांसमोरच दोन्ही गटातील तरुण पुन्हा भिडले. अखेर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. महापालिकेचे उपअभियंता सतीश सावंत यांनाही घटनास्थळी बोलाविण्यात आले. सावंत यांनी, सध्या रस्त्याच्या कामासाठी न्यायालयीन स्थगिती नसल्याने काम सुरू केल्याचा खुलासा केला.

अखेर पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.दरम्यान, काँग्रेस नगरसेवक रस्त्याच्या कामावरून एकमेकांविरुद्ध भिडले असतानाच, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मात्र या कामाचे उद््घाटन थाटामाटात केले. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकर पाटील, युवा नेते अतुल माने, सुशील हडदरे, विजय हिर्लेकर आदींच्या उपस्थितीत भाजपने संधी साधून उद््घाटनाचे सोपस्कार पूर्ण केले.

महापालिकेकडून दुर्लक्ष : विजय हडदरे
सामाजिक कार्यकर्ते सुशील हडदरे म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते विजय हेर्लेकर या रस्त्यासाठी कार्यरत होते. वास्तविक न्यायालयात महापालिकेने जाणीवपूर्वक उपस्थित न राहता रस्त्याचा ताबा अडचणीत आणला होता. परंतु हेर्लेकर व मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर न्यायालयात प्रशासन हजर झाले. त्यानुसार महापालिकेच्याविरोधात असलेल्या याचिकाकर्त्यांनी दावाही मागे घेतला. त्याचा आज मुहूर्त होत आहे.


 

जुना कुपवाड रस्त्यावर न्यायालयीन लढा संपलेला नसताना, स्थानिक नगरसेवकाने दंडुकशाही व पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने काम सुरू केले आहे. जागेची नुकसानभरपाई अद्याप नागरिकांना मिळालेली नाही. आमचा न्यायालयीन लढा सुरूच राहील.
- ईलाही बादरुवाले, माजी नगरसेवक

जुना कुपवाड रस्त्याच्या कामासाठी स्थायी समिती सभापती असताना १ कोटी ४० लाख रुपयांची तरतदू करून निविदा काढली होती, पण न्यायालयीन वादामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता वाद संपल्यानंतर ठेकेदारने काम सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला. मी कधीच श्रेयासाठी काम करीत नाही. माझ्या कामाचे उद््घाटन आमदार, महापौरांच्याहस्ते झाले, हेही काही कमी नाही.
- संतोष पाटील, नगरसेवक काँग्रेस

राजकारणविरहीत भागाचा विकास झाला पाहिजे. पण ज्यांनी या रस्त्याच्या कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रस्ता होऊ नये अशी व्यवस्था केली, ते नगरसेवक आज रस्त्याचे काम होत असताना खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात त्यांचे योगदान काय?
- अतुल माने भाजप युवा नेते
 

Web Title: Sangli: Congregate in Congress; The BJP has completed the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.