लाचप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:07 IST2025-05-03T14:06:42+5:302025-05-03T14:07:15+5:30
जिल्हा परिषदेत द्यावी लागणार हजेरी

लाचप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे निलंबित
सांगली : बचत गटाने घेतलेल्या निविदेचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी समाजकल्याण आयुक्तांनी उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच सांगलीजिल्हा परिषदेत रोज हजेरी लावण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
तक्रारदार यांचा बचत गट आहे. या बचत गटाने समाज कल्याण विभागाकडील एक निविदा घेतली होती. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर केल्याच्या मोबादल्यात सहायक आयुक्त उबाळे यांनी त्यांच्याकडे १० टक्क्यांनुसार लाच मागितली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.१६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता बचत गटाचे आठ लाख १२ हजार रुपये बिल मंजूर केल्याबद्दल १० टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती पाच टक्क्यांप्रमाणे ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
उबाळे यांनी ही रक्कम दि.१७ एप्रिल रोजी घेऊन येण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे यांच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर उबाळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार समाजकल्याण आयुक्तांनी नितीन उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, तसेच रोज जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
बडे मासे गळाला कधी लागणार?
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही विभागांमध्ये गैरव्यवहार होत आहेत. लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्या विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही हे बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला कधी लागणार, अशी चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी रंगली होती.