Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
By घनशाम नवाथे | Updated: July 6, 2024 20:35 IST2024-07-06T20:35:02+5:302024-07-06T20:35:20+5:30
Sangli Accident News: सांगली येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली.

Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
- घनशाम नवाथे
सांगली : येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली. तसेच बसची धडक बसून झाड तुटून पडले. अपघातात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अशोका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (एमएच ०९ जीजे ५४५४) ही रात्री सांगलीतून मुंबईकडे निघाली होती. विश्रामबागहून सांगलीकडे येताना कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बॅंकेपासून काही अंतरावर अचानक चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसले. चालकाच्या हाताला ते चिटकल्यामुळे हात झटकला. या प्रयत्नात चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. बस उजव्या बाजूला रस्ता सोडून ओघळीमध्ये गेली. ओघळीला लागून असलेल्या बागेच्या कठड्याला आणि लोखंडी जाळीला घासत काही अंतर पुढे गेली. तेव्हा समोर गुलमोहोराच्या झाडाला जोराने धडकली. तेव्हा बस जागेवर थांबली. धडकेत झाड तुटून पडले. तर चालकाच्या केबिनसमोरील काचेचा चक्काचूर झाला. केबिनच्या खालील बाजूचे नुकसान झाले.
अपघातानंतर आतील प्रवाशांनी आरडाओरड केला. शेजारून जाणारे वाहनधारक आणि सर्व्हीस रस्त्याशेजारी राहणारे नागरिक घटनास्थळी धावले. तत्काळ आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. एक-दोन प्रवासी जखमी झाले. तर उर्वरीत किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच सुखरूप असलेल्या प्रवाशांंना अन्य बसेसमधून मुंबईकडे रवाना केले. तर चालकासह जखमी प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीनंतर झाडाच्या फांद्या तोडून काढण्यात आल्या. त्यानंतर बस बाहेर रस्त्यावर आणली. अपघातप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे.
रस्ता धोकादायक
मार्केट यार्ड ते कर्मवीर चौकापर्यंत अनेक वाहन धारक वेगाने येतात. याठिकाणी रस्ता थोडा अरूंद आहे. सिग्नल पडण्यापूर्वी पुढे जाण्यासाठी म्हणून दिवसा अनेकजण वेगाने येत असल्याचे चित्र दिसून येते. सात वर्षापूर्वी येथे मोठा अपघात झाला होता.