सांगली : यशवंतपूर-चंडीगड व चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा सांगली स्थानकावरील प्रायोगिक थांबा आता कायम करण्यात आला आहे. किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावरील वास्को-निजामुद्दीन (दिल्ली) गोवा एक्स्प्रेस व निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस या दोन गाड्यांचा थांबाही कायम झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने या दोन गाड्यांची वारंवार मागणी केल्यानंतर दोन्ही एक्स्प्रेसना प्रायोगिक थांबा मिळाला होता. दोन्ही गाड्यांमुळे सांगली जिल्हा देशाच्या महत्त्वपूर्ण भागांशी जोडला गेला. प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने भरपूर प्रवाशांनी प्रवास करावा, यासाठी मंचने या गाड्यांचे वेळापत्रक, तिकीटविक्री व तिकीट उपलब्धतेबाबत जनजागृती अभियान सुरू केले होते. त्याला यश मिळाले व या गाड्यांना सांगली व किर्लोस्करवाडीतून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मंचने मध्य रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून सांगली स्थानकावरील संपर्क क्रांतीचा तसेच किर्लोस्करवाडीत गोवा एक्स्प्रेसचा थांबा पुढे सुरू ठेवावा, अशी विनंती केली होती. या दोन्ही गाड्यांचा थांबा पुढे सुरू ठेवत असल्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.
असा आहे संपर्कक्रांतीचा प्रवाससंपर्कक्रांती एक्स्प्रेस बेंगलोरच्या यशवंतपूर स्टेशनवरून बुधवारी व शनिवारी दुपारी सुटून तुमकूर, आर्सिकेरी, दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव येथे थांबून गुरुवारी व रविवारी पहाटे ३.४० वाजता सांगली स्टेशनवर पोहोचते. सांगली स्टेशनवरून पहाटे ३.४५ वाजता सुटून पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झांसी, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला येथे थांबून चंडीगडला पोहोचते.
कर्नाटक ते सांगली सर्वात वेगवान गाडीकर्नाटकाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून सांगलीत येण्यासाठी संपर्क क्रांती ही सर्वात वेगवान गाडी असून, सुमारे साडेतेरा तासांत बेंगलोर ते सांगलीचे अंतर कापते. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
जिल्ह्यातील सैनिकांसाठी दिलासासांगली जिल्ह्यातील हजारो सैनिक पंजाब व जम्मू कश्मीर येथील सीमेवर देशरक्षणासाठी तैनात असून, या सर्व सैनिकांना आता थेट सांगली रेल्वे स्टेशनवरून चंडीगड, पानिपत, अंबाला तसेच नवी दिल्ली येथे जाता येत असल्याने सैनिकांची मोठी सोय झाली आहे.
कर्नाटकातील बेळगाव धारवाड जिल्ह्यातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्स्प्रेस, लोंढा-मिरज एक्स्प्रेस, कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस व बेळगाव-मिरज पॅसेंजर गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवरून विस्तार करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सांगली जिल्हा नागरी जागृती मंच करणार आहे. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच