व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:14 IST2023-01-05T16:09:07+5:302023-01-05T16:14:50+5:30
साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा

व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा
दिलीप मोहिते
विटा : खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे सरपंच व उपसरपंच निवडीतील योगायोगाची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. थेट सरपंच निवडणुकीत एक साडू निवडून आले, तर दुसरे साडू बुधवारी झालेल्या निवडीत उपसरपंच पदावर विराजमान झाले. विशेष म्हणजे या दोन्ही साडूभाऊंचे नावही अनिल सूर्यवंशी असे आहे.
खेराडे-वांगी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सरपंच पदासह सदस्यांच्या नऊ जागा जिंकून गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलथवून टाकली. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत काँग्रेसचे अनिल तानाजी सूर्यवंशी थेट लोकनियुक्त सरपंच झाले. त्याचवेळी त्यांचे साडू अनिल हिंदुराव सूर्यवंशी यांनी सदस्य पदाच्या निवडणुकीत बाजी मारली.
बुधवारी उपसरपंच निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य अनिल हिंदूराव सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर तत्काळ बँकिंगचे डॉ. कृष्णत चन्ने यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दशरथ सूर्यवंशी, काशीनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय कदम, किसन कदम, संतोष सूर्यवंशी, कृष्णत सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, हिंदुराव सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी उपस्थित होते. निवडीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.