सरकारी कार्यालयात सुटीदिवशी ‘मार्च एंड’साठीची धावपळ; सांगली जिल्हाधिकारी कार्यालय रविवारी गजबजलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:18 IST2026-03-30T19:17:40+5:302026-03-30T19:18:23+5:30
फायलींची ने-आण अन् अधिकाऱ्यांची कामे सायंकाळपर्यंत सुरूच

छाया : सुरेंद्र दुपटे
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील मार्च एंडच्या धावपळीची सुरुवात झाली आहे. महत्त्वाच्या विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुट्या रद्द केल्या असून, सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवले आहे. शनिवार आणि रविवार हे हक्काचे सुटीचे दिवस मानले जातात, मात्र मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आणि इतर नागरिकांची गजबज पाहायला मिळाली.
तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेला निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच खर्च करणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने विशेषतः लेखा विभागातील कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू राहील, असे यापूर्वीच घोषित केले होते. पाच दिवसांचा आठवड्यामुळे शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारी सुटी असते. मात्र, या शनिवारी आणि रविवारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.
विशेषतः पैशांचे व्यवहार ज्या विभागातून केले जातात, अशा विभागांमध्ये सकाळपासूनच गर्दी होती. ३१ मार्चपूर्वी आलेला निधी खर्च करणे, निधीचे वितरण करणे आणि शिल्लक असणाऱ्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे, यासाठी अधिकारी व्यस्त होते. विशेष म्हणजे, सकाळपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत या कार्यालयांचे कामकाज सुरू असल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते.
बिलांसाठी कंत्राटदारांच्याही कार्यालयांत फेऱ्या
शनिवार, रविवार आणि ३१ मार्चला महावीर जयंतीची शासकीय सुटी असूनही मार्च एंडमुळे या सर्व सुट्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी मार्चअखेरपर्यंत काम करणार आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज देखील रविवारी सुरू होते.