Sangli: अहिल्यादेवींच्या पुतळा जागेवरून सत्ताधारी-विरोधकात जुंपली, उरुण ईश्वरपूर पालिकेत बहुमताने ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:34 IST2026-02-21T17:33:54+5:302026-02-21T17:34:13+5:30
सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण

Sangli: अहिल्यादेवींच्या पुतळा जागेवरून सत्ताधारी-विरोधकात जुंपली, उरुण ईश्वरपूर पालिकेत बहुमताने ठराव मंजूर
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर शहरात उभा करण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जागा निश्चित करण्याच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडत वादंग माजले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अगोदर शहरातील समिती करा आणि मग जागा निश्चित करा, असा आग्रह विरोधकांनी धरला. मात्र सत्ताधारी गटाने शनी मंदिराजवळील जागा निश्चितीचा ठराव बहुमताने मंजूर करून घेतला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात शुक्रवारी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. सभेत विषयपत्रिकेवरील उर्वरित १७ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पार्किंग व्यवस्था, अंबिका उद्यान परिसरातील गाळे लिलाव, क्लब हाऊस भाड्याने देणे, पाणीपुरवठा, विविध विकासकामे अशा विषयांचा समावेश आहे.
पुतळा जागेचा विषय ठराव मलगुंडे यांनी वाचून दाखवताच शिंदे गट शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी चर्चेपूर्वीच ठराव कसा करता, आम्हाला विचारले का? फक्त पुतळा नको स्मारक करा, त्यासाठी अगोदर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली शहरातील समिती गठित करा. कोणत्याही एका पक्षाची समिती होऊ देणार नाही. हा शहराचा विषय आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत पुतळ्याला विरोध नाही, तो लोकवर्गणीतून करू त्यासाठी मी १ लाख रुपयांची वर्गणी जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.
त्यावर मलगुंडे यांनी जागा निश्चितीच्या मुद्द्यावर आपली बाजू लावून धरली. या कामाला नगरपालिकेचे पैसे घेणार नाही. समाजाचा प्रश्न आहे, जागा द्या, असे आवाहन केले. मात्र अगोदर समिती करा हा आग्रह राजवर्धन पाटील, अजित पाटील, सतेज पाटील, अमित ओसवाल, अनिता ओसवाल या विरोधकांनी कायम ठेवला. तर सत्ताधारी गटाच्या संदीप माने, कांचन कोळेकर, शुभांगी शेळके, सुनील मलगुंडे, संग्रामसिंह पाटील, सुहास हांडे, सुभाष सूर्यवंशी यांनी जागा निश्चितीचा ठराव मंजूर करा, अशी मागणी लावून धरली.
शेवटी नगराध्यक्षांनी हा ठराव मताला टाकत असल्याचे जाहीर केले. त्याला सत्ताधारी गटाने हात वर करत बहुमताने मंजुरी दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, नमो उद्यान अभियान राबविण्याचा निर्णय झाला. योग विद्याधाम वर्गाला मोफत जागा देण्याची अरुणादेवी पाटील यांची मागणी मान्य करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड उभारणार
अनिता ओसवाल यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाकडे लक्ष वेधत त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. त्यावर भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड बांधण्याला मान्यता देण्यात आली. तसेच त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचेही ठरले. आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांनी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील अशा भटक्या कुत्र्यांची माहिती द्यावी. त्यावर निश्चित कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.