Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:56 IST2023-01-21T17:55:15+5:302023-01-21T17:56:04+5:30
म्हैसाळ योजनेचे पाच टप्प्यात तब्बल ७५ पंप आहेत

Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत
मिरज : जलसंपदा विभागातर्फे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन शुक्रवारी सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात एका पंपाद्वारे उपसा सुरू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत दुसऱ्या टप्प्यात पाणी पोहोचले.
म्हैसाळ टप्पा क्रमांक एक येथे धनंजय कुलकर्णी, नाना सातपुते, उमेश पाटील व शेतकऱ्यांच्या हस्ते कळ दाबून पंप सुरू करण्यात आले. यावेळी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश जाधव, उपअभियंता मारुती साळे, अभय हेर्लेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातून कालव्यात प्रतिसेकंद ५० क्युसेक विसर्ग सुरू असून दुसऱ्या टप्प्यात पाणी पोहोचल्यानंतर सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातील एक पंप सुरू करण्यात आला. शनिवारी आरग येथे टप्पा क्रमांक ३ मध्ये पाणी पोहोचणार आहे.
म्हैसाळ योजनेचे पाच टप्प्यात तब्बल ७५ पंप आहेत. पहिल्या टप्प्यातील २८ पंपांपैकी एका पंपाद्धारे उपसा सुरू झाला असून मागणी येईल त्यानुसार आणखी पंप सुरू करणार आहेत. पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.