वेतनवाढीच्या फरकासाठी निवृत्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार, सांगलीत पार पडला मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:58 IST2025-11-12T16:58:21+5:302025-11-12T16:58:52+5:30
विभागीय कार्यालयासमोर १८ रोजी धरणे आंदोलन

संग्रहित छाया
सांगली : एप्रिल २०१६ नंतर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मेळावा एसटी स्टँडच्या मागील कालिका भवन मंदिर येथे मंगळवारी पार पडला. या बैठकीत वेतनवाढ, घरभाड्याची तीन टक्क्यांची रक्कम व त्याच्या फरकेची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती मिळण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एसटीच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतला.
विलास यादव, विलास चव्हाण, एल. डी. सावंत, मकरंद कुलकर्णी, रवींद्र येळमळी, आर. आर. पाटील आदींनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ३०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
एक एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, घरभाड्याची तीन टक्क्यांची रक्कम व त्याचा फरक तसेच एप्रिल २०२० नंतर मूळ वेतनातील वाढ व त्या अनुषंगाने मिळणारे सर्व आर्थिक फायदे अद्याप मिळालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे थकीत असलेल्या फरकाच्या रकमेची मागणी करूनही ती अद्याप मिळालेली नाही.
त्या मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले असून मागण्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना १८ नोव्हेंबर रोजी देऊन सांगली येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय व राज्य सरकार जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्यादरम्यान घेण्यात आला.
कामगार नेते चंद्रकांत सूर्यवंशी, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे महेश पाटील यांनी करण्यात येणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. यावेळी सुधीर पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, नौशाद वाणकर, पंडित माळी, आनंदराव पवार आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.