राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीचा विस्तार फायद्यात, प्रतिदिन किती उत्पन्न वाढले.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:28 IST2025-01-29T15:28:04+5:302025-01-29T15:28:23+5:30
वार्षिक सव्वादोन लाखावर प्रवासी लाभणार

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीचा विस्तार फायद्यात, प्रतिदिन किती उत्पन्न वाढले.. वाचा
सांगली : मध्य रेल्वे प्रशासनाने सांगली स्थानकावरून सुटणारी पहिली एक्स्प्रेस म्हणून राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसला मागील वर्षी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर प्रवाशांनी या गाडीला मोठा प्रतिसाद दिला आहे. सांगली स्थानकावरून या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारांवर गेले. येत्या मार्चमध्ये या गाडीला वर्षाचा कालावधी पूर्ण होणार असून, प्रवासी संघटनांच्या अंदाजानुसार सांगलीतून विस्तारामुळे वार्षिक सव्वादोन लाख अतिरिक्त प्रवासी या गाडीला मिळाल्याची नोंद होईल.
सांगली-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वेस्थानकाला १३ मार्च २०२४ रोजी पहिलीच एक्स्प्रेस मिळाली. या गाडीपूर्वी एकही एक्स्प्रेस सांगलीतून सुटत नव्हती. पुण्याखालोखाल सांगली रेल्वेस्थानकातून तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होते. आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावरून नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी होती.
राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून पहिली गाडी मिळाली आहे. याच गाडीला सांगली स्थानकावरून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, आरक्षित तिकीट विक्रीने दीड शतकी उंबरठा ओलांडला आहे. मार्च २०२५ मध्ये या गाडीच्या सांगली विस्ताराची वर्षपूर्ती होईल. त्याचा आनंद साजरा करताना विक्रमाचे अनेक आकडे समोर येणार आहेत.
दीडशेहून अधिक प्रवाशांचे बुकिंग
या गाडीला सांगलीपर्यंत विस्तारानंतर सध्या सरासरी प्रतिदिन १६० प्रवासी अतिरिक्त मिळत आहेत. वार्षिक सरासरी काढली तर एकूण ६२ हजार प्रवाशांकडून आरक्षित तिकिटांचे बुकिंग नोंदले जाऊ शकते. पासवर प्रवास करणाऱ्यांची सध्याची संख्या पाहता वार्षिक सरासरी ९१ हजार पासधारकांची नोंद होण्याचा अंदाज आहे.
तिकिटांचा मोठा कोटा
सांगली स्थानक ते बंगळुरूपर्यंत ५६९ तिकिटांचा कोटा मिळाला आहे. www.irctc.co.in या संकेतस्थळावर किंवा सांगली स्थानकावरून तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे सांगलीतून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
बुकिंगसाठीचा सांगलीतून कोटा
- स्लीपर क्लास - २८८ तिकीट
- एसी स्लीपर - ८९
- एसी स्लीपर फर्स्ट क्लास स्वतंत्र केबिन- १०