काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईकांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:22 IST2025-12-19T17:20:18+5:302025-12-19T17:22:13+5:30
'काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत'

काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईकांची वर्णी
सांगली : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांच्या नावाची गुरुवारी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड्. उमेश पाटील यांनी घोषणा केली. तसेच नाईक यांना त्यांनी निवडीचे पत्रही दिले. नाईक समर्थक कार्यकर्त्यांनी सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदासाठी शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश नाईक व मंगेश चव्हाण यांची नावे प्राधान्याने शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
नाईक हे खासदार विशाल पाटील समर्थक तर चव्हाण हे आमदार डॉ. विश्वजित कदम समर्थक आहेत. चव्हाण आणि नाईक यांच्या नावावर गेल्या चार महिन्यांत एकमत झाले नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष ॲड्. गणेश पाटील यांनी नाईक यांना निवडीचे पत्र दिले. नाईक यांनी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदासह १५ वर्षे नगरसेवक होते.
काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपद मिळावे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती. त्यानुसार प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्याकडून प्रयत्न चालू होते. पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याचे काम पाहून संधी दिली आहे. माझ्या निवडीमध्ये काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी एकत्रित चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. माझ्या निवडीमध्ये कोणतेही राजकारण झाले नाही, अशी प्रतिक्रिया नूतन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली.