शिराळा : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे मुख्य ठिकाण असूनही येथील पर्जन्यमापन यंत्रणा सतत काही ना काही कारणामुळे बंद पडत आहे. सध्या दोन वेळा शॉर्ट सर्किट झाल्याने व मोडेम जळाल्याने ही यंत्रणा आठ-दहा दिवसांपासून बंद पडली आहे. मात्र संबंधित कार्यालय याबाबत कोणताही ठोस उपाय करत नाहीत. ऐन पावसाळ्यात ही यंत्रणा बंद पडल्याने आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाला नियोजन करता येत नाही.चांदोली हे मुख्य धरण आहे. तसेच या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे गाव आहे. तसेच चेरापुंजी बरोबर पाऊस पडण्यात बरोबरी करणारे हे ठिकाण आहे. या ठिकाणाबरोबर निवळे, धनगरवाडा येथे पडणाऱ्या पावसावरच चांदोली धरण भरते. महापूर येऊ नये यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्गाचे नियोजन करण्यात येते, मात्र पाथरपुंज येथील यंत्रणा वारंवार बंद पडते, त्यामुळे रिअल डाटावर पावसाची माहिती वेळेत मिळत नाही. येथील यंत्रणा वनविभागाच्या शेडमध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी वनविभागाने या शेडची दुरुस्ती ऐन पावसाळ्यात सुरू केली. यावेळी ही यंत्रणा काढून ठेवली होती. त्यामुळे ही यंत्रणा बंद होती. यावर्षी पावसाच्या सुरुवातीलाच ठेका देण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ही यंत्रणा बंद होती. आणि आता गेल्या आठ दिवसांपासून शॉर्ट सर्किट झाल्याने ही यंत्रणा बंद आहे. दुरुस्ती केली मात्र पुन्हा शॉर्ट सर्किट झाल्याने याचे मोडेम जळाले आहे. त्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे.
ऐन पावसाळ्यात पाथरपुंज येथील पर्जन्यमान मापन यंत्रणा बंद, आठ दिवसांपासून काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:06 IST