Sangli: तक्रार फिरली.. मुख्यमंत्र्यांनी पाहिली अन् वसगडेतील पूल झाला खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:59 IST2025-08-12T18:28:04+5:302025-08-12T18:59:22+5:30
सर्वपक्षीय कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

Sangli: तक्रार फिरली.. मुख्यमंत्र्यांनी पाहिली अन् वसगडेतील पूल झाला खुला
सांगली : वसगडे ते पाचवा मैलदरम्यान रेल्वे रुळावर उभारलेल्या पुलाचे काम अडीच वर्षांपासून सुरू होते. काही दिवसांपूर्वी हे काम पूर्ण होऊनही पूल वाहतुकीसाठी खुला नव्हता. सर्वपक्षीय कृती समितीने याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आणि अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. आदेश झाले अन् तातडीने पूल वाहतुकीस खुलाही करण्यात आला.
वसगडे ते पाचवा मैल यादरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचे काम अडीच वर्षांपूर्वी सुरू झाले होते. बऱ्याचदा हे काम रखडले. त्यामुळे याठिकाणी वाहनधारकांची कसरत होत होती. वाहनधारक त्रस्त झाले होते. नांद्रे ते पलूस या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यात अनेक अडथळे होते. त्यातील पुलाच्या कामाचा अडथळाही होता.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही बॅरिकेट्स लावून पूल बंद होता. सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी सोमवारी याठिकाणचा फोटो समाजमाध्यमांवर टाकला. २० ऑगस्टपर्यंत पूल खुला न झाल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. याची दखल तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमने घेतली. आदेश देण्यात आले अन् सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल सोमवारी दुपारनंतर खुला केला. लागलीच या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्या वॉर रूममुळे अशा प्रश्नांची तातडीने दखल घेतली जात असल्याने समाधान वाटले. कॉ. उमेश देशमुख, महेश खराडे, गजानन साळुंखे, प्रदीप कांबळे या सर्वपक्षीय कृती समितीच्या नेत्यांनीही हा पूल खुला व्हावा म्हणून धडपड केली. - सतीश साखळकर, निमंत्रक, सर्वपक्षीय कृती समिती