गट-तट बाजूला ठेवून राष्ट्रवादीत काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:48+5:302021-06-26T04:19:48+5:30
विटा : जिल्ह्यात सर्वत्र केडर बेस आहे. परंतु, या मतदारसंघात कोणत्याच पक्षाला केडर बेस नसल्याने नेत्यांच्या मर्जीतील लोक पदाधिकारी ...

गट-तट बाजूला ठेवून राष्ट्रवादीत काम करा
विटा : जिल्ह्यात सर्वत्र केडर बेस आहे. परंतु, या मतदारसंघात कोणत्याच पक्षाला केडर बेस नसल्याने नेत्यांच्या मर्जीतील लोक पदाधिकारी होत आहेत, पण पक्ष म्हणून राष्ट्रवादीला वाढवायला या मतदारसंघात खूप जागा आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला ठेवून पक्षाचे गांभीर्यपूर्वक काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले.
विटा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विविध सेलच्या नूतन जिल्हा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बाबासाहेब पाटील, सुशांत देवकर, किरण तारळेकर, सुष्मिता जाधव, विराज नाईक, पूजा लाड, सचिन शिंदे उपस्थित होते.
अविनाश पाटील म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे ऐकले असते तर येथे चित्र वेगळे दिसले असते. परंतु, आता यापुढे पक्षवाढीसाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नवीन धोरणानुसार आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी या मुलाखत घेऊनच होणार आहेत.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी पक्षात प्रवेश केला. आता प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करायचे ठरविले आहे. या मतदारसंघाचा पुढचा आमदार राष्ट्रवादी कॉँग्रेसचा झाला पाहिजे. प्रत्येक वेळा प्रवाहाच्या विरोधात जाण्यापेक्षा आता इथून पुढे पक्षीय राजकारणात तुमचा आदेश आम्ही मानणार आहोत, अशी ग्वाही दिली.
यावेळी किसन जानकर, पूनम महापुरे, सचिन शितोळे, हरिभाऊ माने, स्मिता धर्माधिकारी, लता मेटरकी, विशाल पाटील, अॅड. संदीप मुळीक, माधव रोकडे, सुवर्णा पाटील, विनायक कचरे, सत्यजित पाटील, सिद्धार्थ शितोळे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
चौकट :
आता कसं..भाऊ म्हणतील तसं!
खानापूर मतदारसंघात काम करताना आम्हाला अनेक अडचणी आहेत. येथे कोणत्याही नेत्याचा एक पक्ष राहिलेला नाही. प्रत्येक जण दोन-तीन पक्ष फिरून आलेले आहेत. कोणाचे तर एका महिन्यात दोन-दोन पक्ष झालेले आहेत. त्यामुळे पक्षीय शिस्त वगैरे भानगड आमच्या भागात नाही. निवडणुका आल्या की, आता कसं? भाऊ सांगतील तसं..! असा मामला इकडे चालतो, असे माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले.
फोटो - २५०६२०२१-विटा-एन.सी.पी. : विटा येथे युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अविनाश पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, विराज नाईक, सुष्मिता जाधव आदी उपस्थित होते.