पीयूसी पोर्टलचा सर्व्हर क्रॅश, धूर तपासणीविनाच हजारो वाहने रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:59 IST2025-03-03T11:58:09+5:302025-03-03T11:59:00+5:30
नाहक दंडाची शिक्षा

पीयूसी पोर्टलचा सर्व्हर क्रॅश, धूर तपासणीविनाच हजारो वाहने रस्त्यावर
सांगली : वाहनांची धूर तपासणी करून प्रमाणपत्र देणारे (पीयूसी) पोर्टल आठवडाभरापासून ठप्प आहे. सर्व्हर क्रॅश झाल्याने वाहनांची तपासणी बंद आहे. यामुळे राज्यभरात हजारो वाहनांना नाहक दंडाच्या कारवाईला तोंड द्यावे लागत आहे.
मार्चअखेर तोंडावर आल्याने पीयूसी केंद्रांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे; पण सर्व्हर कोलमडल्याने धूर तपासणी ठप्प झाली आहे. पोर्टल सुरू करताच एरर असा संदेश येत आहे. याबाबत पीयूसी चालकांच्या संघटनेने परिवहन आयुक्तालयाकडे तक्रार केली असता दुरुस्तीचा काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तांत्रिक दोष असल्याने आमच्या हातात काही नाही, असेही उत्तर मिळाले. परिणामी, गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सर्व वाहनांची धूर तपासणी बंद आहे. कागदपत्रे अपलोड होत नसल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. राज्यभरातील सर्व पीयूसी केंद्रे बंद आहेत.
नाहक दंडाची शिक्षा
राज्यभरात ५० जिल्ह्यांत मिळून सुमारे २२०० पीयूसी केंद्रे आहेत. तेथील कामकाज ठप्प झाल्याने वाहने धूर तपासणीविनाच रस्त्यावरून धावत आहेत. यातील अनेक वाहनांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाली आहेत. पोलिस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगूनही वाहनमालकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
सर्व्हर हॅक..?
धूर तपासून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या पोर्टलचा सर्व्हर हॅक झाल्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली; पण प्रशासनाने त्याला दुजोरा दिलेला नाही. यापूर्वीही आरटीओचे पोर्टल हॅक करून बनावट प्रमाणपत्रे देण्याचे प्रकार घडले आहेत. वाहन परगावी असताना, ते पीयूसी केंद्रासमोरच असल्याचे दाखवून अवघ्या २००-३०० रुपयांत प्रमाणपत्र देण्याचे प्रकार घडले होते. ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकल्यानंतर परिवहन आयुक्तांनी धूर तपासणीसाठी जिओ टॅगिंगची सक्ती केली. त्यानुसार पीयूसी केंद्रापासून पाच-दहा मीटर अंतरातच वाहन असेल, तर प्रमाणपत्र मिळते.